कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ९८ हजार गुन्हे दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई, दि. ८ : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील ९८ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या १९० घटना घडल्या.

त्यात ६८६  व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते ७ मे या कालावधीत कलम १८८ नुसार  ९८,७७४ गुन्हे नोंद झाले असून १९,०८२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ६६ लाख ३१ हजार ७९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

१०० नंबर

पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.  लॉकडाऊनच्या काळात या १०० नंबर वर प्रचंड भडिमार झाला. ८६,२४६ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.

तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाइन असा शिक्का आहे अशा ६५३ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण २,२६,२३६ व्यक्ती क्वारंटाइन आहेत.

अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ३,१५,४३४ पास देण्यात आले आहेत.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२८६ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५४,१४८ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिसांसाठी कोरोना विशेष कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ३, पुणे १, व सोलापूर शहर १ अशा ५ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला.

राज्यात ६२ पोलीस अधिकारी व ४९५ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत.

पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

राज्यात एकूण ४७२९ हजार रिलिफ कॅम्प आहेत. तर जवळपास ४,२८,७३४  लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी.

त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.  लॉकडाऊनच्या काळात सर्व नियमांचे पालन करून कोरोनाशी मुकाबला करण्यास सहकार्य करावे.

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. लॉक डाऊनमध्ये थोडीशी शिथिलता मिळाली असली म्हणजे लॉक डाऊन संपले असे नाही.

उलट या काळात  सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

Leave a Comment