कपाशीची पूर्व हंगामी लागवड करु नका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अकोला : कपाशी पिकावर शेंद्री (गुलाबी) बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी कपाशीची पूर्व हंगामी लागवड करू नये, असे आवाहन पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.

अकोला जिल्ह्यामध्ये १.६० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगाम २०२० मध्ये कपाशी पिकाचे लागवडीचे लक्ष ठेवण्यात आले असून त्यापैकी ७०% कोरडवाहू व ३०% ओलित क्षेत्र आहे.

शासनाने जिल्ह्यासाठी आठ लाख बियाणे पॅकेटसचे आवंटन दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये खाजगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून १.६० हेक्टर क्षेत्रासाठी ८ लाख बियाणे पॅकेटस वितरकांकडे पोहोच झाले आहेत.

त्यामुळे कापूस बियाण्यांचा मुबलक पुरवठा जिल्ह्यामध्ये झाला आहे. तथापि, कपाशी बियाण्याची उपलब्धता भरपूर प्रमाणात असून जिल्ह्याला बियाणे कमी पडणार नाही, कुठेही तुटवडा भासणार नाही.

केंद्र शासनाने कपाशी बियाण्याच्या किंमती ठरवून दिल्या आहेत. त्या BG-I साठी ६३५ रुपये प्रति पॅकेट व BG-II साठी ७३० रूपये प्रति पॅकेट अशा आहेत.

जिल्ह्यामध्ये बियाणे विक्री परवानाधारक ६४० असुन त्यांच्यामार्फत बियाणे उपलब्ध होणार आहे, असे पालकमंत्री कडू यांनी स्पष्ट केले आहे.

श्री.कडू यांनी म्हटले आहे की, शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर होऊ नये यासाठी बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करणे हा एकमात्र चांगला यशस्वी उपाय आहे.

सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेंद्री बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊन कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

त्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पूर्व हंगामी कपाशी लागवड करू नये, असे आवाहन पालकमंत्री कडू यांनी केले आहे. दि. १५ मे पर्यंत वितरकांपर्यंत बियाणे उपलब्ध होईल व ३० मे पर्यंत विक्री केंद्रावर उपलब्ध होईल.

मागील वर्षी २०१९-२० मध्ये ज्याप्रमाणे १ जुन नंतर प्रत्यक्ष शेतकरी बांधवांना कपाशी बियाण्यांची विक्री केली होती त्याप्रमाणे यावर्षी केली जाईल.

त्यामुळे शेतकरी बांधवांनी बियाणे संदर्भात कोणतीही काळजी करू नये व हंगामपूर्व कपाशी लागवड करू नये, असे आवाहन पालकमंत्री श्री.कडू यांनी केले आहे.

Leave a Comment