जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :-  7 मे रोजी धांदरफळसह संगमनेर शहरालगतच्या कुरणरोड परिसरात करोनाबाधित रुग्ण सापडला होता.

त्यानंतर 9 मे रोजी अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी संगमनेरात धाव घेत या दोन्ही ठिकाणी पाहणी करीत या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना दिल्या.

त्याच दिवशी रात्री उशीराने त्यांनी आदेश बजावून रुग्ण आढळलेल्या धांदरफळसह संपूर्ण संगमनेर शहर व येथून पाच किलोमीटर अंतरावरील कुरणगाव ‘हॉटस्पॉट’ म्हणून जाहीर केले.

जिल्हाधिकार्‍यांनी बाधित क्षेत्रासह एकही संशयीत अथवा रुग्ण नसलेल्या कुरण गावला हॉटस्पॉट घोषीत करण्याची कृती चुकीची आणि बेकायदा असल्याचे सांगत तेथील सुमारे दोनशे लोकांनी जिल्हाधिकार्‍यांकडेच तक्रार केली होती,

आता याच विषयावर कुरणच्या महम्मदशरीफ अब्दुलकरीम शेख यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली असून अ‍ॅड.के.एन.शेरमाळे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

संगमनेर शहरापासून 5 किलोमीटर अंतरावरील कुरण गावात मुस्लिमबहुल वस्ती आहे. सध्या रमजानचा महिना सुरु असल्याने व त्यातच जिल्हाधिकार्‍यांनी हा परिसर ‘हॉटस्पॉट’ जाहीर केल्याने तेथील ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

मात्र कोणत्याही सण-उत्सवांपेक्षा मानवी जीव महत्वाचा असल्याने प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात आहेत, त्याचाच भाग म्हणून आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या अधिकारांचा वापर करीत कुरणगावही प्रतिबंधित केले आहे.

कोरोना विरोधातील महामारीत देशभरातील जिल्हाधिकार्‍यांच्या भूमिका महत्त्वाच्या असतांना संगमनेरात मात्र थेट त्यांच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालय गाठण्याचा प्रकार राज्यात बहुधा पहिलाच ठरण्याचीही शक्यता आहे. सदरची याचिका औरंगाबाद उच्च न्यायालय कशा पद्धतीने निकाली काढते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment