हलणारे हात आणि डोळ्यात दाटलेली आतुरता…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सोलापूर, दि. 17 – रेल्वेच्या प्रत्येक खिडकीतून हात हलत होते आणि प्रत्येक खिडकीतल्या डोळ्यात गावी कधी एकदा पोहोचतो, याचीच आतुरता लागून राहिली होती.

सोलापूर रेल्वे स्टेशनवर आज दुपारी असे चित्र होते. लॉकडाऊनमुळे सोलापूर जिल्ह्यात अडकलेल्या मध्यप्रदेशातील मजूर, विद्यार्थी,

पर्यटक इत्यादी  नागरिकांना घेऊन श्रमिक विशेष रेल्वे आज ग्वाल्हेरसाठी सोडण्यात आली.  सोलापूर रेल्वे स्थानकातून दुपारी दोन वाजून वीस मिनटांनी ही रेल्वे सुटली.

नागरिक, विद्यार्थी यांनी अत्यावश्यकच साहित्य सोबत घेतले होते.  थर्मल स्क्रीनिंगने तपासणी केली जात असताना काही लहान मुलांना आपली उत्सुकता लपवता येत नव्हती.

त्याचवेळी मात्र मुलांच्या आईची नजर एक क्रमांकच्या प्लॅटफार्मवर उभ्या असलेल्या रेल्वेकड़े लागलेली दिसत होती. एका तरुणाने तर डब्यात चढण्यापूर्वी डब्याच्या पायऱ्यांना वाकून नमस्कार केला.

सर्व नागरिकांनी अतिशय शिस्तबद्धरित्या आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून घेतली. त्यानंतर रेल्वे आणि पोलीस कर्मचारी यांनी सांगितलेल्या जागेवर जाऊन बसल्यावर तर चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय असा होता.

प्रशासन, रेल्वे विभाग, पोलिस यंत्रणामार्फत उत्तम व्यवस्था करण्यात आली.  एकूण 1314 जणांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र 1146 नागरिकांना घेऊन ग्वाल्हेरसाठी रेल्वे रवाना झाली.

सर्व प्रवाशांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.  स्थानक परिसरात नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग केले गेले. रेल्वेचे अधिकारी कर्मचारी यांनी नागरिकांना त्यांच्या कोचपर्यंत पोहोचवले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, समन्वय अधिकारी दीपक शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे आदी अधिकारी उपस्थित होते.

या आधी सोलापूर विभागातील पंढरपूर आणि कुर्डूवाडी रेल्वे स्थानकातून दोन रेल्वे रवाना झाल्या आहेत. पंढरपुरातून 9 मे रोजी 981 प्रवाशांना घेऊन रेल्वे तामिळनाडू येथे रवाना झाली होती.

त्यानंतर 14 मे रोजी कुर्डूवाडी स्थानकावरुन लखनौसाठी विशेष रेल्वे रवाना झाली आहे. लखनौ, पाटना, हावडा, रांची येथे जाण्यासाठी  प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. संमती मिळताच विशेष रेल्वे सोडण्यात येईल, असे समन्वय अधिकारी दीपक शिंदे यांनी सांगितले.

छायाचित्रकार यशवंत सादूल यांची समयसूचकता

एक महिला बाळाला  घेऊन रेल्वे स्थानकावर उशिरा पोहोचली. महिलेला बाळासहित पळताना पाहून लोकमतचे छायचित्रकार यशवंत सादूल यांनी  बाळाला आपल्या कुशीत घेतलं आणि महिलेला डब्यापर्यंत पोहोचवलं.

गाडी सुटताना अवघे काही मिनिटं असताना महिला पोहोचल्याने प्रशासन आणि पोलिसांनीदेखील अधिक वेळ घेत गाडी काही मिनिटांसाठी थांबवली. कागदपत्र तपासणी, थर्मल चेकअप करून महिलेस जागा उपलब्ध करून देण्यात आली.

लक्ष्मी हायड्रोलिक्सस्पेन्कामार्फत फूडपाकीट

रेल्वेतून जाणाऱ्या सर्वांना लक्ष्मी हायड्रोलिक्स, स्पेन्का वॉटर यांच्या मार्फत नाष्टा, जेवण, पाणी यांची व्यवस्था करण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून अडकलेल्या या नागरिकांनी घरी परतताना समाधान होत असल्याची भावना व्यक्त केली.

Leave a Comment