लॉकडाऊन काळात ३९५ सायबर गुन्हे दाखल; २११ जणांना अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई दि. १८ – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पावले उचलली असून राज्यात ३९५ गुन्हे दाखल केले आहेत,

अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे. टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ३९५ गुन्ह्यांची (ज्यापैकी १७ N.C आहेत) नोंद १७ मे २०२० पर्यंत झाली आहे.

गुन्ह्यांचे विश्लेषण

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १६९ गुन्हे दाखल झाले आहेत. आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी १५४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी १८ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ७ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .

तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, यू ट्यूब) गैरवापर केल्याप्रकरणी ४३ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २११ आरोपींना अटक केली आहे . यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन करण्यात यश आले आहे .

हिंगोली  जिल्ह्यातील कुरुंडा पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ,त्यामुळे जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ७ वर गेली आहे.

या गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीला धार्मिकतेचा  रंग देणारा  टिकटॉक व्हिडिओ बनवून , सदर व्हिडिओ विविध सोशल मीडियावरून प्रसारित केला आहे ,त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

ऑनलाईन व्यवहारात खबरदारी

सध्या लॉकडाउनच्या काळात ८-१७ या वयोगटातील मूले,  स्वतःच्या घरातील डेस्कटॉपवरून तर कधी आपल्या पालकांच्या लॅपटॉप किंवा मोबाईलवरून इंटरनेटचा वापर सर्रासपणे करत आहेत .

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विशेषतः पालकांना विनंती करते कि कृपया आपले पाल्य ऑनलाईन काय व कोणती वेबसाईट्स सर्फ करतात यावर लक्ष ठेवा .

त्यांना ऑनलाईन कोणी काही फसवत नाही आहे याची खबरदारी घ्या. शक्यतो आपल्या ऑफिसचा लॅपटॉप वा मोबाईल आपल्या पाल्यास हाताळायला देऊ नका.

तसेच जर कोणी आपल्या पाल्यास ऑनलाईन फसवत असेल किंवा त्रास देत असेल व आपल्या पाल्याने जर आपणास हे सांगितले तर त्याची तक्रार नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये ताबडतोब द्या. तसेच  http://www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण नोंदवा .

लॉकडाऊनबाबत फक्त राज्य व केंद्र सरकार अधिकृतरित्या जी माहिती व नियमावली वेळोवेळी प्रसिद्ध करतील त्यावरच विश्वास ठेवा  व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका . असे आवाहन सायबर विभागाचे ​विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केले आहे.

Leave a Comment