त्या वैद्यकीय अधिकार्‍याकडून जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांना त्रास देण्यास सुरुवात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी देण्यात आलेले संरक्षण कीट पळविणार्‍या निवासी वैद्यकीय अधिकार्‍याचे निलंबन करुन कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी घरीच अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप मुरंबीकर यांनी शनिवार दि.16 मे रोजी नाशिक विभागीय आरोग्य उपसंचालकांचे लेखी आश्‍वासन दिल्याने काळे यांनी सदरील उपोषण मागे घेतले. मात्र या प्रकरणातील निवासी वैद्यकीय अधिकारीने जिल्हा रुग्णालयातील सहकारी व कर्मचार्‍यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली असून,

पुन्हा या वादग्रस्त निवासी वैद्यकीय अधिकार्‍याच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे. कोरोनाच्या संकटकाळात सेवा देणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांसाठी मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमधून आलेले उच्च दर्जाचे संरक्षण किट जिल्हा रुग्णालयातून गहाळ झाल्याचा प्रकार घडला.

निवासी वैद्यकीय अधिकार्‍याचे सदरील किट स्वत:च्या गाडीतून पळविल्याचे उघडकीस आले. या प्रकरणातील निवासी वैद्यकीय अधिकार्‍याचे निलंबन करुन कारवाई करण्यासाठी छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी दि.12 मे पासून घरीच अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते.

आंदोलनाची दखल घेत शनिवारी नाशिक विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ.म.रे. पट्टणशेट्टी यांनी चौकशी अहवालानुसार वरिष्ठ कार्यालयानुसार योग्य ती नियमानुसार कारवाई करण्याचे लेखी आश्‍वासन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप मुरंबीकर यांच्या मार्फत पाठविले. तर कोरोना महामारीचा विचार करता सदरील आंदोलन मागे घेण्यात आले.

या प्रकरणात काळे यांनी जिल्हा रुग्णालयातून माहिती मागवली असता त्यांना उडवा-उडवीची माहिती देण्यात आली आहे. सी.सी. टिव्ही कॅमेरे बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. सदरील गंभीर प्रकार उघड होऊ नये यासाठी तीन कॅमेर्‍याचे फुटेज गायब करण्यात आले आहे. डॉ.सुनिल पोखरणा हे खरोखर आरोपी असून, दिशाभूल केली जात असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.

हा प्रकार दडपण्यासाठी पोखरणा यांनी जिल्हा रुग्णालयातील सहकारी व कर्मचार्‍यांना त्रास देण्यास सुरुवात केली असून, चोराच्या उलट्या बोंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यापुर्वी देखील त्यांनी एका महिला कर्मचार्‍यास वेठीस धरल्याने तीला जीव गमवावा लागला होता.

डॉ.पोखरणा हे नेहमीच वादग्रस्त व्यक्तीमत्व असून, त्यांनी कर्मचार्‍यांना त्रास दिल्यास छावा क्रांतीवीर सेना सर्व आरोग्य कर्मचार्‍यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहून डॉ.पोखरणा यांचे सर्व प्रकरणे चव्हाट्यावर आनणार असल्याचे काळे यांनी म्हंटले आहे. तर डॉ.पोखरणा यांच्यावर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठविण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment