अंतिमसत्राच्या परीक्षा रद्द करण्याविषयी युजीसीसोबत पत्रव्यवहार सुरू – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सिंधुदुर्गनगरी, दि. १९ – विद्यापीठ अनुदान समितीने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान घ्याव्यात अशा सूचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे राज्य शासनाने निर्णय घेतला होता. पण, सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रापर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत.

त्याचप्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्यात याविषयी विद्यापीठ अनुदान आयो(युजीसी)सोबत पत्रव्यवहार सुरू असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेणे शक्य होणार नसल्याचे युजीसीला पाठविलेल्या पत्रात नमुद केल्याचे सांगून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले,

राज्यातील 8 ते 10 लाख विद्यार्थ्यांच्या  आरोग्याचा तसेच मानसिक स्वास्थ्याचा विचार करता अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना मार्क्स ग्रेडेशन पद्धतीने देण्याविषयी युजीसी लिहिले आहे. याप्रकारे ग्रेडेशन करताना कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीने हे मार्क्स ग्रेडेशन करण्यात येणार आहे.

युजीसीच्या मार्गदर्शनानुसारच हे ग्रेडेशन देण्यात यावे. याविषयी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेतली असून त्यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासन राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल. विद्यार्थ्यांच्या हिताचा, आरोग्याचा आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार करून युजीसीला पत्र केले आहे. या पत्राचा युजीसीला विचार करावाच लागेल, असे श्री. सामंत म्हणाले.

याविषयी ठोस निर्णय घेण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव अजोय मेहता, शिक्षण सचिव विजय सौरव यांची बैठक घेण्यात येणार आहे.

तसेच राज्यातील कुलगुरूंशी चर्चा करून युजीसीच्या सुचनांप्रमाणे ग्रेडेशनची पद्धत स्वीकारून पुढे काय करायचे याविषयी मुख्यमंत्री यांच्या संमतीने येत्या दोन दिवसात ठोस निर्णय घेतला जाणार आहे.

सीईटीच्या परिक्षांसाठी तालुकास्तरावर केंद्र

सीईटीच्या परीक्षांसाठीचे वेळापत्रक सध्या जाहीर करण्यात आले आहे. पण त्याविषयी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून काही निर्णय घ्यावे लागले तर तसे निर्णयही भविष्यात घेतले जातील, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सध्या जुलैच्या 4 तारखेपासून 31 तारखेपर्यंत युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

यामधून काही विद्यार्थ्यांची परीक्षा राहिल्यास पुन्हा 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 5 लाख 24 हजार 907 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

पण, यापरीक्षा देताना काही विद्यार्थी शिल्लक राहिले तर त्यांचाही विचार या परीक्षांमध्ये करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा केंद्रांवर होणारी ही परीक्षा तालुका केंद्रावर घेण्यात येणार आहे.

तालुका केंद्रावर परीक्षा घेताना सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन केले जाईल. विद्यार्थ्यांना सेंटर बदलाची मुभा मिळणार आहे. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्यात अडचणी उद्भवल्यास त्यांना केंद्रावर नेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्याक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या पदव्युत्तर वैद्यकीय व पदव्युत्तर दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळे किंवा इतर काही कारणांमुळे लिंक, वेबसाईटमध्ये काही अडथळे निर्माण झाले असतील तर त्या लिंक, वेबसाईटही पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या उर्वरित सीईटी परीक्षांच्या तारखाही लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या सर्व अडचणींचाही आढावा घेतला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना आरोग्याच्या कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत यासाठी शासन कटीबद्ध आहे आणि त्या दृष्टीनेच काम करण्यात येणार आहे.

तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत, त्यांच्या परीक्षा फी पुढील सत्रासाठी वापरणे किंवा त्यांना फी परत करणे याविषयी चर्चा सुरू आहे.

त्यातून विद्यार्थ्यांना दिलासा दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठीचे निर्णय राज्य शासन घेईल, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

Leave a Comment