कोरोनाविरुध्द लढाईत माजी सैनिकही सरसावले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

देशाच्या सीमेवर लढताना आपला नेमका शत्रू कोण हे सैनिकांना माहीत असते. परंतु देशात एका अदृश्य शत्रुने आक्रमण केले आहे, त्यांचे नाव कोरोना..

गेल्या दोन महिन्यापासून डॉक्टर्स, पोलीस, महसूल विभाग, सफाई कामगार या कोरोनाविरध्दच्या लढाईत अहोरात्र झटत असताना देशाच्या रक्षणासाठी ज्या सैनिकांनी लढा दिला, ते माजी सैनिकही अदृश्य शत्रुरुपी कोरोनाविरुध्दच्या लढाईत पुढे सरसावले आहेत.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जेव्हा माजी सैनिकांना आवाहन केले तेव्हा माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने हाकेला प्रतिसाद दिला.

जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, भोर, वेल्हा, जुन्नर, येथे माजी सैनिक चेक पोस्टवर संरक्षणासाठी जबाबदारी बजावत असताना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याची दुहेरी भूमिका बजावत आहेत.

पोलिसांची संख्या व त्यांच्यावरील कामाचा ताण पाहता आपण का बर घरी बसून राहावे, आपणही देशासाठी पुढे आलो पाहिजे, अशी स्वाभाविक प्रतिक्रिया माजी सैनिकांनी व्यक्त केली.

पोलिसांच्या खाद्यांला खादा लावून आरोग्यसेवक, स्वयंसेवक, सेवाभावी संस्था आदी कार्यरत आहेत. कोरोना विरुध्दची लढाई आपण नक्की जिंकू असा आशावादी संकल्प करत,

प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी पुणे जिल्हातील माजी सैनिकांनी पुन्हा अंगावर वर्दी चढवली आहे. त्यामुळे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत आहे.

पोलिसांना एक प्रकारचे मानसिक समाधान मिळत आहे. कोरोनाविरुध्दच्या जीवघेण्या लढाईत पोलिसांवरील कामाचा ताण कमी होऊन ते तणावमुक्त सेवा देत आहेत, अशी प्रतिक्रिया जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलींद तुंगार यांनी व्यक्त केली.

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील आजी माजी सैनिक संघटनेच्यावतीने फक्त चार दिवसात 35 हजार रूपये आणि 600 किलो अन्नधान्यांचे संकलन केले. बारामती पोलीस दलास माजी सैनिक सहकार्य करीत आहेत.

त्यांना विशेष पोलीस अधिकारी कोवीड-19 योध्दा या नावाने विशेष ओळखपत्र देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णाला रक्ताचा तुटवडा कमी पडू नये, याकरिता रक्तदानही केले आहे.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी या गावात एकूण 30 हजार रूपये जमा करून गावातील नागरिकांना आवश्यक ती मदत पोहचवली आहे, अशी माहिती आजी माजी सैनिक संघटनाचे कार्याध्यक्ष अनिल शिंदे यांनी दिली.

बारामती शहरामध्ये पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली जय जवान आजी माजी सैनिक संघटनेच्यावतीने ‘पोलीस व माजी सैनिक साथ साथ’ कोरोनाविरोधी मोहिम राबविण्यात येत आहे.

यामध्ये पोलिसांच्या सोबत ‘चित्ता’ ड्रेस परिधान केलेले माजी सैनिक रस्त्यावर उतरले असून ते नागरिकांना शिस्तीचे धडे देत आहे. त्यांना सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पोलिसांसोबत नेमून दिलेले काम एकदिलाने करीत आहेत.

नागरिकांनी मास्क वापरावे, शारीरिक अंतर ठेवावे, अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये, ज्येष्ठ नागरिकांची कोरोना विषाणूपासून कशी काळजी घ्यावयाची, अशी प्राथमिक स्वरुपात माहिती देत आहेत.

शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त करण्याबरोबर चेकपोस्टवर कर्तव्य बजावत आहेत. पोलीस प्रशासन व माजीसैनिक यांच्या समन्वयाने बारामती तालुका कोरोनामुक्त करण्यास हातभार लागत आहे.

जुन्नर येथील माजी सैनिक संघटनेच्यावतीने कोराना विषाणूच्या विरुध्द लढा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या पीएम केअर्स निधीत व मुख्यमंत्री सहायता निधीत अनुक्रमे 65 हजार रुपयांचे योगदान दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना देशातील वेगवेगळ्यास्तरावर कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांनी आपल्या भावनेनुसार, आवडीनुसार,

वेळेनुसार, https://covidwarriors.gov.in/  या डिजिटल व्यासपीठावर स्वेच्छेने सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील एकूण 9 हजार 814 माजी सैनिकांनी या डिजिटल व्यासपीठावर ऑनलाईन नोंदणी करुन सहभागी झाले आहेत.

त्यापैकी पुणे जिल्ह्यातील 1 हजार 587 माजी सैनिक आहेत राज्यातील इतर जिल्ह्याचा विचार करता सर्वाधिक माजी सैनिक पुणे जिल्ह्यातील आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8 एप्रिल 2020 रोजी कोरोना युद्धात सहभागी होऊन शासनाच्या बरोबरीने काम करू इच्छिणाऱ्या आणि आरोग्य सेवेत काम केलेल्या लोकांनी जसे की आरोग्य सेवेत काम केलेले निवृत्त सैनिक,

निवृत्त परिचारिका, वॉडबॉय, आरोग्य सेवेत प्रशिक्षण पूर्ण केलेले परंतु ज्यांना जागा नाही म्हणून काम मिळाले नाही, पण त्यांना काम करण्याची इच्छा आहे,

त्या सर्वांनी पुढे येऊन आपले  नाव, पत्ता covidyoddha@gmail.com  या ई मेल वर नोंदवावे, असे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे जिल्ह्यातील माजी सैनिक कोरोनाविरुध्दच्या युध्दात सहभागी झाले आहेत.

इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून या गावातील मुख्यरस्त्यावर उभारण्यात आलेल्या चेक पोस्टवर माजी सैनिक सेवा बजावत आहेत.

पळसदेव ग्रामपंचायत आणि माजी सैनिक यांच्या समन्वयाने मुख्य रस्त्यावर चौकशी कक्ष सुरु करण्यात आले आहे.

देशावर आलेले कोरोना विषाणूचे संकट हे आपल्याला परतून लावायचे आहे. लष्करातील जवानांनी एकदा अंगावर वर्दी चढवली की त्यांच्या अंगातली लष्करी वृत्ती,

लढाऊ बाणा अखंड सळसळतो भले ते सेवानिवृत्त झाले तरीही ! याची अनुभूती पुणे जिल्ह्यातील माजी सैनिकांनी पुन्हा एका प्रयत्यास आली आहे.

देशाच्या संरक्षणासाठी ज्या निस्वार्थ वृत्तीने माजी सैनिक लढले त्याचप्रमाणे कोरोना विरुध्दच्या लढाईत तन-मन-धनाने माजी सैनिक उतरले असून खऱ्या अर्थाने आपण या कोरोना योद्धांचा सन्मानच केला पाहिजे, अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.

Leave a Comment