मुंबईतील घरपोच वृत्तपत्र वितरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची वितरकांशी चर्चा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई, दि २०: लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात आपण रेड झोन आणि कंटेनमेंट क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील उर्वरित भागामध्ये आपण काही प्रमाणात उद्योग-व्यवसाय- तसेच दुकाने व इतर बाबी सुरु केल्या आहेत.

वृत्तपत्रे ही आपली दैनंदिन गरज आहे. सध्या कोरोनाच्या भीतीमुळे वृत्तपत्रांची घरोघर वितरण आपण बंद ठेवले असले तरी हे तात्पुरते आहे.

यातून आपण परिस्थिती पाहून लवकरच मार्ग काढू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईतील वृत्तपत्र वितरकांशी संवाद साधत होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना ही आरोग्य विषयक आणीबाणी असल्याचे सांगत वृत्तपत्र वितरणावर बंधने आली असली तरी यावर लवकरच मार्ग काढला जाईल असे सांगितले.

यावेळी वितरकांनी देखील मुंबईतील सोसायट्यांमध्ये कोरोना संसर्गामुळे वृत्तपत्र घेण्यास लोकांची तयारी नाही त्यामुळे सुरक्षित अंतर पाळून स्टॉलवर विक्री करीत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आपण काही जीवनावश्यक वस्तू, अन्न पदार्थ यांची घरपोच वितरणास परवानगी दिली असली तरी त्यांना देखील संसर्ग होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी आहे अन्यथा प्रादुर्भाव वाढून आरोग्याला धोका होऊ शकतो.

Leave a Comment