राज्य आपत्ती प्रतिसाद आणि निवारण निधीतून कोविड-१९ साठी फक्त १७१ कोटी वितरित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चंद्रपूर, दि. 26 : केंद्र शासनाकडून राज्य शासनाला कोरोनाविरुद्ध उपाययोजनेसाठी एकही पैसा मिळाला नाही. राज्याच्या वाट्याच्या नियमित मिळणाऱ्या राज्य आपत्ती प्रतिसाद आणि निवारण निधीच्या प्राप्त 1611 कोटीपैकी फक्त 601 कोटी अर्थात 35 टक्के निधी कोविडसाठी खर्च करता येतो.

त्यापैकी फक्त 171 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपूर येथे दिली.

मान्सून पूर्व  बैठकीत सहभागी होण्यासाठी  ते चंद्रपूर येथे आज आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य शासनाला दरवर्षी राज्य आपत्ती प्रतिसाद आणि निवारण निधी मिळत असतो.

त्यातूनच कोरोनाविरुद्धच्या उपाययोजनांसाठी आतापर्यंत 171 कोटी वितरित केले आहे. याशिवाय  राज्य शासनाला केंद्र शासनाकडून कोणताही विशेष निधी कोविडसाठी मिळाला नाही.

दर वर्षी राज्य शासनाला राज्य आपत्ती प्रतिसाद आणि निवारण निधी मर्यादित क्षमतेत दिला जातो. 2020-21 साठी 4 हजार 296 कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. राज्य आपत्ती प्रतिसाद आणि निवारण निधी (एसडीआरएमएफ) मधील निधीपैकी 35 टक्के निधी हा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीसाठी राखीव असतो.

त्यानुसार राज्याचा राखीव निधी अर्थात नियमित मिळणारा निधी 1718.40 कोटी आहे.

केंद्र शासनाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद आणि निवारण निधीमधील त्यांच्या हिश्श्याच्या 75 टक्के रकमेपैकी 1611 कोटी  निधी प्राप्त झाला आहे.

यापैकी 35 टक्केपर्यंत निधी अर्थात 601 कोटी एवढाच निधी कोविड साठी खर्च केला जाऊ शकतो. त्यामुळे आतापर्यत 171 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे.

सध्या कोविडसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद फंडातून 156 कोटी इतका निधी मंजूर करण्यास राज्य कार्यकारी समितीने मान्यता दिली आहे. तो वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती श्री. वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना चंद्रपूर येथे दिली.

Leave a Comment