सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा सक्तीची ; राज्य सरकारचा निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- महाराष्ट्र राज्य सरकराने मराठी बाणा दाखवत २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात शासन निर्णयही काढण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सदर माहिती दिली. यावर्षी इयत्ता पहिली आणि सहावीच्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे.

राज्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्यानं मराठी हा विषय सर्व शाळांमध्ये सक्तीचा करण्यात येणार आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात पहिली आणि सहावीसाठी, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात दुसरी आणि सातवीसाठी, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि आठवीसाठी, तर २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात चौथी आणि नववीसाठी,

तर २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पाचवी आणि दहावीसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. शासन आदेश काढून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

मराठी माध्यमांव्यतिरिक्त इतर माध्यमं आणि अन्य व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये अन्य भाषांचे पर्याय उपलब्ध असल्यानं मराठी भाषा अनिवार्य स्वरूपात करण्याकडे दुर्लक्ष झालं आहे.

तामिळनाडू, तेलंगण, केरळ, कर्नाटक या राज्यांच्या धर्तीवर ९ मार्च रोजी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे करण्याबाबत अधिनियम पारित करण्यात आला आहे.

त्या अनुषंगानंच राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्यात आली असल्याचं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment