डल्ला मारण्याची सवय असलेल्या विरोधकांना जनतेचा आवाज कल्ला वाटणे स्वाभाविकच – माजी महापौर अभिषेक कळमकर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- करदात्यांच्या पैशातून त्यांनाच सोयीसुविधा पुरवताना काम दर्जेदार होणे महत्त्वाचे असते. दुर्देवाने विरोधकांना फक्त ठेकेदाराकडून मिळणार्‍या मलिद्याचीच चिंता असते. तपोवन, बोल्हेगाव रस्त्याच्या कामाबाबत शिवसेनेनेे सर्वप्रथम आवाज उठवून राज्य सरकारकडे तक्रार केली. त्यामुळे सरकारने तातडीने चौकशी समिती नेमली.

यादरम्यान ठेकेदाराचे बिलही थांबवण्यात आले आहे. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला असून त्यांनी पूर्णपणे चुकीचे आरोप करुन थयथयाट चालवला आहे. मोठा गाजावाजा करून रस्त्याचे उद्घाटन, कामाच्या पाहणीचा फार्स करणारांनी त्याचवेळी आवाज उठवला असता तर आज रस्ता दर्जेदार झाला असता.

परंतु, त्यांच्या दृष्टीला स्वत:च्या वैयक्तिक फायद्यापलिकडे काहीच दिसत नाही. त्यांचे हे पितळ अवघ्या काही दिवसांतच उघडे पडल्याने आता जनतेचा आवाज बनून कार्यरत असलेल्या शिवसेनेवर केविलवाणे आरोप केले जात आहेत. शिवसेनेने जनतेच्या आवाजाला वाट करून दिली असून त्यांना जनतेशी देणेघेणेे नसल्याने त्यांना जनतेचा आवाज कल्ला वाटणे स्वाभाविकच आहे, अशी टिका माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केली आहे.

तपोवन व बोल्हेगाव रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी व तपासणी सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेवर टिका केली होती. या टिकेला शिवसेनेच्यावतीने प्रत्युत्तर देण्यात आले असून विरोधकांना सर्वात जास्त दु:ख ठेकेदाराचे बिल थांबवल्याचे झाले आहेे. लोकांनीही त्यांचा कावेबाजपणा व खाबूगिरीची वृत्ती ओळखली असल्याने आता सारवासारव करण्यासाठी शिवसेनेकडे बोट दाखविले जात आहे, असा टोला कळमकर यांनी लगावला आहे.

तपोवन व बोल्हेगाव रस्त्याचे काम पुन्हा सुरु होवून ते दर्जेेदार होईपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. कोणाला आपल्या वार्डात इतरांनी येवून गैरप्रकार उघडे करू नये असे वाटत असले तरी आमच्यासाठी जनतेचे हित महत्त्वाचे असल्याने शिवसेना नेहमीच याहीपेक्षा मोठा आवाज उठवत राहिल.लाईट घोटाळ्यात लोटकेचा लोटा कोणाच्या हातात राहिला हे नगरकरांनी बघितलंय.

नागरकरांचे रस्त्याबाबत समाधान होईपर्यंत ठेकेदाराला बिल अदा करू नये अशीच शिवसेनेची भूमिका राहील, असेही कळमकर यांनी म्हटले आहे.शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या 25 वर्षाच्या आमदारकीचा हिशोब विरोधक मागत असतात. परंतु विद्यमान आमदारांची पाच वर्षाची वैयक्तिक प्रगती पाहता त्यांना संपत्तीची अदलाबदल करण्याचे आव्हान यापूर्वीच राठोड यांनी दिलेले आहे.

तपोवन रस्त्यासाठी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी आमदार असतानाही निधी दिला होता. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यावर त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्र्यांकडे या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा केला होता. परंतु, केवळ श्रेय घेण्यात पुढे असलेल्यांनी नेहमीप्रमाणे कामाचे श्रेय स्वत:कडे घेतले. आताच्या लोकप्रतिनिधींनी रस्त्याचे काम सुरु असताना वेळोवेळी पाहणीही केल्याचे वृत्तपत्रात प्रसिध्द झालेले आहे.

त्यावेळी त्यांना रस्त्याचे काम दर्जेदार नसल्याचे दिसले नाही का? याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे. त्यांच्यासाठी कामापेक्षाही दाम किती मिळणार हे महत्त्वाचे असल्याने त्यांनी निकृष्ट कामाकडे डोळेझाक करून ठेकेदाराला अभय दिले असावे. जनतेच्या पैशाचा असा अपव्यय होत असल्याचे पाहून शिवसेेनेने सर्वप्रथम रस्त्याच्या कामाची चौकशीची मागणी करून नागरिकांच्या सह्यांची मोहिम राबवली.

आता चौकशी सुरु झाल्याने आपले नसते उद्योग बाहेर येण्याच्या भितीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांनी केलेला खोटपणा जनतेनेही चांगलाच ओेळखला आहे. अशा प्रवृत्तीविरोधात शिवसेना भविष्यातही जनतेचा आवाज बनेल.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment