आधी कोरोना आता पावसाने रडवला शेतकरी ; अतिवृष्टीने ‘इतके’ नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे. अहमदनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पावसाळ्याच्या सुरवातीच्या २ महिन्यातच जिल्ह्यात १३० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे.

प्रशासनाने अतिरिक्त पावसाने नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करून पंचनामे करण्याची व शेतकर्‍यांना आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे. जून, जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली.

मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे. या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले.

सुरुवातीला जोमात आलेले कपाशीचे पीक आता मोठ्या प्रमाणात पाते गळू लागल्यामुळे धोक्यात येऊ लागले आहे. या पावसामुळे झाडांची खालची पाने लालसर-पिवळी पडू लागली आहेत.कपाशीवर मावा-तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.

काही ठिकाणी कपाशीचे पीक पाण्यात डुंबत होते. तर काही ठिकाणी जास्त पाण्यामुळे कापसाचे रोपटे वाहून गेल्याचे प्रकार घडले आहेत. तालुक्यात मोठ्या क्षेत्रात कपाशीची लागवड झालेली आहे. कपाशीवरच तालुक्यातील शेतकर्‍यांचे आर्थिक गणित अवलंबून आहे.

कपाशी सारख्या नगदी पीकांच्या होणार्‍या नुकसानीमुळे शेतकर्‍यांच्या चितेंत भर पडली आहे. एकरी उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. या पांढर्‍या सोन्याने मागील काही वर्षांत तालुक्याचे अर्थकारण बदलवलेले आहे.

कपाशीवर आधारित जिनिंग उद्योग अवलंबून आहेत.यामुळे यावर्षी कपाशी शेतकर्‍यांना व नवउद्योजकांना उपाशी तर ठेवणार नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोव्हिडच्या महामारीमुळे अगोदरच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी निसर्गाच्या या संसर्गामुळे अधिक हैराण झाला आहे.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment