जयंत येलुलकरांची सीना नदीची कविता होतेय व्हायरल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  काही वर्षांपूर्वी सीना नदी म्हणजे नगरची शान समजली जात होती. मात्र याच नदीचे रूपांतर गटारीसारखे झाले असून, नदीच्या पात्रांमध्ये अनेकांनी अतिक्रमण केले आहे.

वाढत्या अतिक्रमणाने नदीचे पात्र अरुंद झाले आहे. दरम्यान नगरच्या रसिक ग्रुपचे अध्यक्ष व माजी नगरसेवक जयंत येलुलकर यांनी नुकतीच सीना नदी विषयी एक कविता व्हॉटसअॅपच्या वर व्हायरल केली आहे.

ज्याची चर्चा सध्या नगरकरांमध्ये चांगलीच रंगली आहे. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांश रस्ते पाण्याने भरून गेले. या प्रवाहांतून मार्ग काढणे नगरकरांना जिकरीचे झाले, अनेकांनी मनपाविषयी संताप व्यक्त केला.

या पार्श्वभूमीवर येलूलकर यांनी कवितेच्या माध्यमातून महापालिका कारभाराचे काढलेले वाभाडे तसेच सीना नदीही विकून टाका असे मनपा प्रशासनाला केलेले आर्जव चर्चेत आले आहे.

येलुलकरांची ती कविता अशी : सन्माननीय साहेब, महापालिका नगररचना, महसूल, भूमी अभिलेख.. सस्नेह नमस्कार, नगर शहरातील सगळे नैसर्गिक ओढे, नाले संगनमताने बुजवले तुम्ही, बरंच झालं..

या बदल्यात तुम्हालाही चांगले पैसे मिळाले असतीलच.. तुमच्या आनंदातच आमचा आनंद आहे.. हे सगळ करत असताना तुम्हाला कोणी काही बोललं का? नाहीं ना.. अहो, कधीच बोलणार नाही आमचे बिच्चारे नगरकर..

किती वर्षे मान खाली घालून जगत आहोत आम्ही.. ती सवयच होऊन गेलीय आम्हाला आता… आज वीस मिनिटांच्या पावसाने सगळ शहर कसं पाण्यात बुडाल्यासारख वाटलं.. किती छान..शहर धुतल्याचं समाधान…

स्वच्छ झालं आमचं महानगर.. अधून मधून असं व्हायलाच हवं.. म्हणूनच फार बरं झालं ओढे बुजवून.. आमच्या दलालांनीही तुम्हाला यासाठी खूप मदतही केली.. त्यांचे आभारही कोणत्या शब्दात मानावे..साहेब,

कशी आहेत आमची इथली माणसं.. चांगली,भोळी आहेत ना.. म्हणूनच असं देवकार्य चालूच ठेवा.. एक आग्रहाची विनंती करू का साहेब.. तेवढी सीना नदीही बुजवता येते का पहा.. खूप सारे पैसे मिळतील तुम्हा सगळ्यांना..

नाहीतरी सीना आता कोरडीच आहे.. वय ही खूप झालंय आता तिचं.. हळूच गळा दाबा तिचा, क्षणात मान टाकेल ती.. मरायलाच टेकली आहे.. आम्ही तरी किती करायचं तिचं..

म्हणजे मग पाऊस झाला की बोटीही फिरवता येतील या गल्लीतून त्या गल्लीत.. घाबरू नका, तेवढं काम कराच साहेब.. स्वतःच्या पोराबाळांच्या हिताचं पहा.. त्यांच्या भविष्याचा विचार करा..

पुण्या, मुंबईत त्यांना आलिशान फ्लॅट घेऊन द्या म्हणजे मग आम्हालाही काही पुण्याचं काम झाल्याचं समाधान मिळेल. साहेब, करा तेव्हढं काम, बुजवा सीना नदी.. घोटा तिचा गळा..

इथे तुम्हाला कोणी विचारायलाही येणार नाही..मग, जेलमध्ये टाकायचं तर सोडाच.. तुम्हाला माहिती आहे ना आम्ही कसे …. डू आहोत.. तर मग करता ना सुरुवात, शहराच्या नकाशाची खाडाखोड करायला.. आपला नेहमीच मान खाली घालून उभा असलेला.. एक नगरकर.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment