तोंडावर गोड… मात्र पडद्यामागून सूत्रे हलवली जातात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील प्रोफेसर चौकातील भाजीपालावाले व गाळाधारकांचे वाद व यामध्ये मनपाची भूमिका याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र आता या प्रकरणाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ लागली आहे.

यावरून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. मनपातील सत्ताधाऱ्यांकडून प्रोफेसर चौकातील भाजी, फळ विक्रेते, गाळेधारक, स्थानिक रहिवाशांना मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करीत वेठीस धरण्याचे काम सुरू आहे.

यामध्ये निव्वळ श्रेय लाटण्यासाठी राजकारण केले जात असल्याचा घाणाघाती आरोप, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे. काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, या परिसरातील भाजी – फळ विक्रेत्यांवरील अन्यायकारक कारवाई विरोधात शहरातील काँग्रेस धावून गेली.

मात्र काहींना हे पचलेले नाही. यामुळे काही मंडळी पडद्यामागून सूत्र हलवत आहेत. हा प्रश्न सोडविण्याचे श्रेय कोणाला घ्यायचे असेल तर त्यांनी ते जरूर घ्यावं. पण श्रेयासाठी राजकारण करत सर्वसामान्यांना वेठीस धरू नये अशी मागणी काळे यांनी केली आहे.

मध्यंतरी इथे झालेल्या वादामध्ये काँग्रेस पक्षाने यशस्वी मध्यस्थी करत तोडगा काढत भाजीवाल्यांना कृष्ठधाम रोडवरील मोकळ्या जागेमध्ये बसवण्याचा पर्याय समोर ठेवला होता. गाळेधारक, स्थानिक रहिवाशांसह त्याला अनेक भाजी विक्रेत्यांनी सहमती दर्शवली होती.

महापौर यांनी देखील तोडगा मान्य करत मनपा अतिक्रमण विभाग यापुढे त्रास देणार नाही अशी सर्वांसमोर ग्वाही दिली होती. मात्र तोंडावर गोड बोलून पडद्या मागून या सर्वांना त्रास देत त्यांना वेठीस धरत राजकारण केले जात असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. आधी स्वतः वातावरण चिघळवून प्रश्न निर्माण करायचा.

त्यानंतर आमच्यामुळेच हा प्रश्न सोडवला गेला असा कांगावा करीत श्रेय लाटायचे. यासाठीच हा खेळ सुरू असल्याचा आरोप शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी कुणाचे नाव न घेता केला आहे.

येत्या दोन दिवसात मनपाने कोणाच्याही दबावाला बळी न पडता याबाबत सामोपचाराने योग्य तोडगा काढला नाही तर काँग्रेस आक्रमक होत तीव्र आंदोलन करेल, असा इशारा काळे यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment