प्रवरेला पूर; घरांमध्ये शिरले पाणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  रात्रभर सुरू असलेला मुसळधार पाऊस व त्यातच मुळा धरणातून वीस हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदी दुधडी भरून वाहू लागली.

मध्यमेश्वर बंधाऱ्याच्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे प्रवरा नदीला मिळणाऱ्या ओढ्याचे पाणी उलट्या दिशेने नेवासे शहरातील मारुतीनगर व संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रोड परिसरात असलेल्या रामकृष्णनगर चक्रनारायण वसाहत परिसरात घुसल्याने या भागातील नागरिकांनी अख्खी रात्र जागून काढावी लागली.

यामध्ये या भागातील रहिवाशांचे अतोनात हाल झाले असून घरात पाणी शिरल्याने गृहपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले. गुरुवारी रात्रीच्या सुमारास मुळा धरणातून वीस हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. याबाबत आधीच नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने मॅसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आला होता.

सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे अचानक प्रवरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नेवासे पोलिस स्टेशन हद्दीतील प्रवरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही पोलिस यंत्रणेच्या मार्फत देण्यात आला होता.

प्रवरा नदीत सोडण्यात आलेले पाणी व मुसळधार सुरू असलेल्या पाण्यामुळे मारुतीनगर, रामकृष्णनगर व चक्र नारायण वसाहत भागात असणारे ओढे ओहरफ्लो झाल्याने या भागात रात्रीच्या एकच्या सुमारास पाणी शिरले. यामुळे नागरिक भयभीत झाले.

यात काहींनी अख्खी रात्र घराच्या तळमजल्यावर बसून, तर मारुतीनगर प्रभागातील रहिवाशांनी मंदिर व उंच जागेवर बसून जागून काढली. यावेळी कोणत्याही प्रकारची प्रशासकीय यंत्रणा मदतीसाठी धावून आली नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रोडवर असलेल्या चक्रनारायण वसाहतीमध्ये पाणी शिरल्याने घरातील कपडे, भांडे, गृहपयोगी वस्तू वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. शासनाने नुकसान झालेल्या भागाचे त्वरित पंचनामे करावेत, तसेच या भागात असलेल्या ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात यावे,

अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली. मारुतीनगर परिसरात असलेला ओढा ओव्हरफ्लो झाल्याने पाणी आजूबाजूला असलेल्या शेतात शिरले. यामुळे शेतपिकांचे नुकसान झाले असून शासनाने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment