अति पावसाने पिके धोक्यात; शेतकर्‍यांना धडकी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात काही भागात वादळी वार्‍यासह जोरदार पावसामुळे खरीप पिके भुईसपाट झाले आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आता टाकळीभान परीसरात गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामी पिके पाण्याखाली जाऊ लागली आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या झालेल्या अतिवृष्टीची आठवण येऊन आता गेल्या वर्षीची पुनरावृत्ती होणार काय ? या भितीने शेतकर्‍यांना धडकी भरली आहे.

अतिपावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे. या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले.

परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले. सुरुवातीला जोमात आलेले कपाशीचे पीक आता मोठ्या प्रमाणात पाते गळू लागल्यामुळे धोक्यात येऊ लागले आहे. या पावसामुळे झाडांची खालची पाने लालसर-पिवळी पडू लागली आहेत.

कपाशीवर मावा-तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. काही ठिकाणी कपाशीचे पीक पाण्यात डुंबत होते. तर काही ठिकाणी जास्त पाण्यामुळे कापसाचे रोपटे वाहून गेल्याचे प्रकार घडले आहेत. गेल्या तीन चार दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे काढणीला आलेली खरिपाची पिके पाण्याखाली जात आहेत.

काही ठिकाणी ढगफुटीचा आनुभव शेतकरी घेत आहेत. सततच्या पावसामुळे खरीप पिकांमध्ये पाणी साचले जात आहे. दररोज कोसळणार्‍या पावसामुळे शेतकर्‍यांना गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीची आठवण होऊन यंदाचा खरीप हंगामही पाण्यात जातो की काय? या भितीने धडकी भरू लागली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment