अबब! ‘ह्या’ गावांत ढगफुटी; झाली ‘अशी’ दानादिन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्याच्या काही भागात मागील काही दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल नेवासे तालुक्यातील बर्‍हाणपूर, म्हाळस पिंपळगाव, महालक्ष्मीहिवरा, माका, रस्तापूर, कौठा, देडगाव, लोहारवाडी, मांडेमोरगव्हाण आदी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस पडला.

तालुक्यातील काल झालेल्या वादळी पावसामुळे खरीप पिके भुईसपाट झाले आहेत. परिसरातील पावसाचे वाहुन आलेले पाणी व अतिवृष्टीने काही घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. यापूर्वी या परिसरात झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झालेच होते

मात्र त्यानंतर तीन-चार दिवस पावसाने उघडीप दिल्याने बळीराजाला हायसे वाटले मात्र गेल्या दोन दिवसांपासून या गावामधील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हा पाऊस अगदी ढगफुटीसदृश असल्याने काही मिनिटांत शेताचे तळे होऊन ओढ्या-नाल्यासारखे पाणी शेतामधून वाहत आहे.

पावसामध्ये वार्‍याचेही प्रमाण असल्याने मका व ऊस शेतीचे नुकसान झाले. या पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे. या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले. सुरुवातीला जोमात आलेले कपाशीचे पीक आता मोठ्या प्रमाणात पाते गळू लागल्यामुळे धोक्यात येऊ लागले आहे.

या पावसामुळे झाडांची खालची पाने लालसर-पिवळी पडू लागली आहेत.कपाशीवर मावा-तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. काही ठिकाणी कपाशीचे पीक पाण्यात डुंबत होते. उसाचे पिक जमिनीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नवीन उसाच्या लागवडी वाया गेल्या आहेत.

जुन्या कांद्याला भाव वाढत आहेत मात्र नवीन कांद्याची पुर्णत: वाताहात झाली आहे. भाजीपाला तर शेतातच सडला आहे. त्यामुळे त्यांचेही भाव वाढले आहेत. कालच्या पावसाने तर परिसरातील कौतुकी, बार बोडी, खारी, कौठा, बर्‍हाणपूर आदी सर्वच नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

कृषी विभागाने तत्परता दाखवत नुकसानीचे पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment