अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ चिमुकल्याचा खून;मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथील वेदांत देशमुख या चिमुकल्याची अमानुष हत्या झाल्याच्या घटनेला पाच वर्ष पूर्ण झाले. वेगवेगळ्या एकूण 17 पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला मात्र अद्याप देखील तपास पूर्ण झालेला नाही.

त्यामुळे तपास पूर्ण होऊन आरोपीला शासन कधी होणार ? असा सवाल उंचखडक येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका निवेदनातून विचारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नात लक्ष घालावे. म्हणून हा तपास या प्रकरणाचे तत्कालीन तपासी अधिकारी प्रवीणकुमार लोखंडे यांचेकडे पूर्णवेळ देण्यात यावा,

अशी मागणी उंचखडक ग्रामस्थांनी थेट मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे. 13 ऑक्टोबर 2015 रोजी वेदांत देशमुख हा चिमुकला गावातून गायब झाला. पाच दिवसांनी त्याचा मृतदेह विहिरीत सापडला. त्यानंतर 2016 मध्ये 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण उंचखडक गावात 5 दिवस बेमुदत उपोषण करण्यात आले होते.

यावेळी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देऊन हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. तेव्हा मुख्यमंत्री यांनी या खुनाचा सखोल तपास करण्याच्यादृष्टीने विशेष तपास पथक स्थापन केले होते.

तपास योग्य दिशेने चालू असताना हे विशेष तपास पथक बरखास्त करून हा तपास स्थानिक गुन्हे शाखेत वर्ग करण्यात आला. नंतर पुन्हा सहा महिन्यांच्या आत अकोले पोलीस स्टेशनकडे हा तपास वर्ग करण्यात आला. सदरच्या तपासातील दिरंगाई पाहता पुन्हा ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट 2018 रोजी जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देऊन

पूर्ण वेळ तपासासाठी पोलीस निरीक्षक लोखंडे यांच्याकडे तपास सोपवावा, अशी मागणी केली होती. तेव्हा पुन्हा एसआयटी स्थापन करण्यात आली.परंतु नंतर पोलीस निरीक्षक यांचेकडून तपास काढून घेतला, पुढील दोन वर्षे त्या तपासात कोणत्याही प्रकारची प्रगती दिसून आली नाही व पाच वर्षे होऊनही वेदांत देशमुखला अद्याप न्याय मिळाला नाही.

अकोले पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाचा कोणताही तपास झालेला नाही. तत्कालीन पोलीस अधिकारी यांना वाचविण्यासाठी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला जात नाही.लवकरात लवकर तपास पूर्ण न झाल्यास पोलिसांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा उंचखडक ग्रामस्थांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment