आता परतीचा पाऊसही बळीराजाच्या मानगुटीवर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  यंदा पाऊस खूप बरसला. जूनच्या पहिल्याच आठवड्यात दमदार सुरु झालेल्या पावसाने अगदी आजपर्यंत दमदार हजेरी लावली आहे. या पावसाने खरीप पिकांवर अक्षरशः पाणी फिरवले.

परंतु आता परतीचा पाऊसही बळीराजाच्या मानगुटीवर बसला आहे. शेतांना तळ्यांचे स्वरूप येऊन पिके नष्ट झाली. वादळासह आलेल्या पावसामुळे खरिपातील पिके, ऊस व फळबागा जमीनदोस्त झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागात बुधवारी सायंकाळपासून गुरुवारी सकाळपर्यंतच्या काळात हाहाकार उडाला आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील अनेक भागात अतिवृष्टी झाली.

यामुळे नद्या, नाल्यांना पूर आले. अनेक ठिकाणी रस्ते बंद होऊन जनजीवन विस्कळित झाले होते. अहमदनगर जिल्हाही याला अपवाद नाही. जिल्हयाच्या विविध भागात परतीच्या पावसाने विजांच्या लखलखाटात, ढगांच्या गडगडाटासह धुडगूस सुरू केला आहे.

काल नगर, श्रीरामपूर शहर, शिर्डी, राहाता, राहुरी, अकोले, कोपरगाव, नेवासा संगमनेरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणचा वीजि पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अडचणींशी सामना करावा लागला. श्रीरामपूर शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला.

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे संध्याकाळी सात वाजता विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा प्रारंभ झाला यावेळी विजेचा दोन ते तिन वेळा मोठा भयानक आवाज झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रसंगी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता

तर शेतकर्‍यांच्या दृष्टीने सदर पावसामुळे पिकांच्या संदर्भात मोठे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे. अकोले तालुक्यात विविध भागात पाऊस सुरू होता. त्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शिर्डी तसेच राहाता तालुक्यात अनेकठिकाणी पाऊस झाला. रात्री 9 वाजता सुरू झालेला पाऊस 10 वाजेनंतरही सुरू होता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment