कर्जत-जामखेड राजकीय रणसंग्राम ; आ. रोहित पवारांनी मांडली वर्षभराच्या कमाची जंत्री

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :-  कर्जत-जामखेड तालुक्यात राजकीय रणसंग्राम पेटला आहे. एका वर्षानंतर पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी कामाचा हिशेब विचारायला सुरूवात केली आहे. परंतु राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही नेहमीच कामात पारदर्शकता ठेवली आहे.

निवडणुकीपूर्वीच पवार यांनी हा मतदारसंघ आदर्शवत करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे ते स्वतःहून कामाचा हिशेब मांडत असतात. फेसबुक पेजवर त्यांनी कामाची जंत्री मांडली आहे. विधानसभा निवडणुकीला एक वर्ष झाले. त्यानिमित्त भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार पवार यांच्या एक वर्षाच्या काळात कामे होत नसल्याची टीका केली होती.

आपल्या काळात मंजूर केलेली कामेही हाणून पाडण्यात येत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता. त्यानंतर आज आमदार पवार यांनीही आपण गेल्या वर्षभरात केलेल्या कामांची माहिती दिली आहे. कोणतंही काम करायचं असेल तर त्याची एक प्रक्रिया असते. सर्वेक्षण, प्रस्ताव, तांत्रिक-प्रशासकीय मान्यता, निधीची उपलब्धता आणि निविदा काढल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरवात.

ही संपूर्ण प्रक्रिया काही एका चुटकीसरशी होणारी नसते, तर त्यासाठी वेळ लागत असतो. निवडणूक झाल्यानंतर पहिले दोन महिने हे सरकार स्थापनेतच गेले. त्यानंतर पुढील तीन महिन्यात राज्याच्या विकासाचं व्हिजन असलेलं महाविकास आघाडी सरकारचं एक वस्तूनिष्ठ अंदाजपत्रक आदरणीय अजितदादा यांनी मांडलं.

अनेक विकासकामं आणि त्यासाठी आर्थिक तरतूद यात केली होती, पण अधिवेशन संपत नाही तोच जागतिक महामारीच्या संकटाने आपल्या राज्यात हातपाय पसरले आणि या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करण्याऐवजी सगळा निधी आरोग्य सुविधांकडं वळवावा लागला.

दुसरीकडं राज्याला येणारा महसूल लॉकडाऊनमुळं पूर्णपणे ठप्प झाला.आरोग्यविषयक खर्चाची तोंडमिळवणी करणंही अशक्य झालं. केंद्राकडून येणारा हक्काच्या GST चा निधी तर अजूनही थकीत आहे. आणि गेल्या सात महिन्यांपासून तर आपण कोरोनालाच सामोरं जात आहोत, हे वेगळं सांगायची गरज नाही.

असे रोहित पवार म्हणाले. पवार यांनी या कामांसाठी सर्वांची साथ आवश्यक असल्याचे सांगताना म्हटले आहे, ‘विशेष म्हणजे मी एकटा हे सर्व करु शकत नाही. त्यासाठी ‘कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन’, बारामती ऍग्रो ली., कृषी विज्ञान केंद्र, बारामती, या संस्थांसोबतच इतरही अनेक संस्था,

पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी, महिला भगिनी, युवा या सर्वांचंच मोलाचं सहकार्य मिळतंय.थोडक्यात काय तर कर्जत-जामखेडच्या विकासाची पेरणी केली असून प्रयत्नांची मेहनत आणि सर्वसामान्य जनतेच्या साथीचं खत घालून कर्जत-जामखेडच्या मातीत विकासाचं पीक काढण्याचा माझा प्रयत्न आहे. हे पीक लवकरच बहरात येईल, असा विश्वास आहे.

वर्षभरातील कामांचा हा लेखा जोखा मांडत असताना विरोधकांनीही केवळ विरोधासाठी विरोध न करता कर्जत-जामखेडच्या विकासासाठी सहकार्य करावं, असं माझं आवाहन आहे. कारण त्यांना कुण्या ‘एका व्यक्तीचा’ विकास करण्याचं काम सुरू नाही तर संपूर्ण मतदारसंघाचा विकास करण्याचं काम सुरू आहे,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीपूर्वीपासूनच मतदारसंघात संपर्क असल्याने इथल्या कामाचा बऱ्यापैकी आवाका लक्षात आला होता. रस्ते, पाणी, वीज हे मूलभूत प्रश्न तर आ वासून होतेच पण सरकारी योजनाही लोकांपर्यंत पोचत नव्हत्या. त्यामुळं प्रत्येक विषयाचा बारकाईने अभ्यास करुन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केला. रस्ते, पाणीपुरवठा, वीज याचे अनेक प्रस्ताव मंजूर करुन आणले. ही कामे लवकरच सुरु होतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment