बेशिस्त वाहनधारकांमुळे शहरातील रस्ताच बनतोय पार्किंगतळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- शहरातील अरुंद रस्ते, वाहन पार्किंगचा अभाव, फूटपाथवर फेरीवाले, विक्रेत्यांचे अतिक्रमण, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे बेशिस्त वाहनचालक, रिक्षा चालकांचे कुठेही असणारे थांबे यामुळे नगरमध्ये वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे.

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठेत खरेदीदारांची झुंबड पहायला मिळत आहे. परंतु, पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने उभी करताना होणारी कसरत वाहतूक कोंडी सर्वसामान्यांची डोकेदुखी ठरत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नगरकरांच्या गर्दीने बाजारपेठेतील रस्ते ओसंडून वाहत आहेत.

मात्र, रस्त्यावर बेशिस्तपणे लावलेली वाहने, पार्किंगचा अभाव व अतिक्रमणांमुळे बाजारपेठेबरोबरच ग्राहकांचाही श्वास गुदमरतो आहे. बाजारपेठेत पायी चालणेही अवघड झाले आहे. वाहतूक शिस्तीचा मागमूसही या भागात नाही. किमान सणासुदीत खरेदी सुखावह करणारे नियोजन करण्याची आवश्यकता व्यापारी व ग्राहकांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या संकटाची धग काही अंशी कमी झाल्याने नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठ गाठली आहे. दरम्यान कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्याने नागरिकांनी मास्क व फिजिकल डिस्टंसिंगचा वापर करणे आवश्यक आहे. तथापि, खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता नियम मात्र, पायदळी तुडवले जात आहेत.

गर्दी होण्यापूर्वी खरेदी करावी, या उद्देशाने अनेक जण बाहेर पडल्याने मागील आठवड्यापासूनच बाजारपेठ गजबजलेली आहे. जिल्हाभरातून खरेदीसाठी नागरिक नगरला येतात.

वाहन पार्किंगची व्यवस्था नसल्याने अनेक जण खरेदीसाठी आल्यानंतर दुकानांबाहेरच वाहने उभी करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. बाजारपेठेत ग्राहकांची संख्या वाढत असल्याने व त्यात अस्ताव्यस्त पार्किंग व मध्येच उभ्या राहणाऱ्या रिक्षांमुळे सर्वत्र वाहतूक कोंडी होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment