बिबट्याचा शहराजवळील वावर पाहता महापालिकेने पाणी सोडण्याच्या वेळेत बदल करावा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-नगर शहराच्या आसपासच्या गावांमध्ये सध्या हिंस्र बिबट्याच्या वास्तव्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अनेक जनावरे, लहान निरपराध मुले, नागरिकांना त्याने आपले भक्ष्य केले असून हे प्राणी आपल्या भक्षाच्या शोधात लांब लांब भटकत असतात.

त्यामुळे बिबट्याचा शहराजवळील वावर पाहता महापालिकेने भल्या पहाटे पाणी सोडण्याच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी माजी नगरसेवक जयंत येलूलकर यांनी केली आहे. नुकतेच शहरापासून जवळ असलेल्या चांदबिबी महालावर तीन ते चार बिबटे नागरिकांच्या नजरेस पडले. त्याचे व्हिडीओचित्रणही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

खरेतर आपल्या शहरवासीयांच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब असून बिबटे भक्ष्याच्या शोधात शहरामध्येही येऊ शकतात. शहराच्या आसपास असलेली उपनगरे अतिशय विरळ असून अगदी महामार्गाजवळ वसलेली आहेत.

भल्या पहाटे अंधार असताना शहराच्या विविध भागात पाणी सुटत असते. महिला वर्ग मोठ्या प्रमाणात पाणी भरायला उपस्थित असतो.

काही दिवसांतील बिबट्याच्या घटना पाहता महापालिकेने सध्यातरी भल्या पहाटेची पाणी सोडण्याची वेळ बदलावी व काळजी घ्यावी, अशी विनंती माजी नगरसेवक जयंत येलूलकर यांनी महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना केली. ही सूचना काहींना अतिशयोक्ती जरी वाटत असली, तरी वास्तव नाकारता येणार नाही.

शहरांमध्ये मोठ्या वृक्षांची जरी वानवा असली, तरी शहर, व उपनगर भागात झुडूपे मोठ्या प्रमाणात आहेत आणि अशा हिंस्र प्राण्यांना लपून बसायला हे पुरेसे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment