फिनिक्स फाऊंडेशनचे कार्य निस्वार्थ भावनेचे -मा. आ. शिवाजी कर्डिले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-समाजाला निस्वार्थ भावनेने कार्य करणार्‍यांची खरी गरज आहे. फिनिक्स फाऊंडेशनचे कार्य निस्वार्थ भावनेने सुरु आहे. अनेक वर्षापासून गरजू घटकातील नागरिकांना माणुसकीच्या भावनेने आरोग्यसेवा देण्यात येत आहे.

महागाईच्या काळात आरोग्यसेवा खर्चिक असल्याने सर्वसामान्यांना न परवडणारी झाली आहे. फिनिक्सचे आरोग्य शिबीर गरजूंना आधार बनली आहेत. महात्मा फुलेंच्या नावाने दिला जाणार्‍या पुरस्कारासाठी देखील निस्वार्थ भावनेने कार्य केलेल्या योग्य व्यक्तींची निवड झाल्याचे प्रतिपादन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले.

फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांसाठी आधार ठरलेले बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, सावली संस्थेचे नितेश बनसोडे व अमरधाम येथील सेवक स्वप्निल कुर्‍हे यांना महात्मा फुले स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी माजी आमदार कर्डिले बोलत होते. यावेळी नागरदेवळेचे सरपंच राम पानमळकर, बापूसाहेब शिंदे, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, अय्युब पठाण, मयुर पाखरे, गौरव बोरुडे, अमोल धाडगे, राजू ताजणे, मयुर पाखरे, सौरभ बोरुडे, सुरेश नन्नवरे आदि उपस्थित होते. प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे यांनी कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवरील टाळेबंदी काळात फिनिक्स सोशल फाऊंडेशन सर्वसामान्य रुग्णांसाठी आधार ठरला असून, टाळेबंदीत गरजू रुग्णांची गरज ओळखून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या धाडसाने विविध शिबीरे घेण्यात आली.

मागील पाच महिन्यात कोरोना काळात नियमांचे पालन करुन झालेल्या शिबीराचा तब्बल 4 हजार 370 गरजूंनी लाभ घेतला. तर 948 ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या. गरजूंना मोफत चष्मे व औषधांचे वाटप करण्यात आले. तर नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती करुन त्याला प्रतिबंध करण्यासाठी आर्सेनिक गोळ्या, मास्क व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले.

कोरोनामुळे इतर आजाराच्या गरजू रुग्णांची परवड होऊ नये यासाठी फिनिक्सने कार्य केल्याचे विशद केले. तसेच चारही पुरस्कार्थींनी कोरोनाच्या संकटकाळात केलेल्या सेवेचा आढावा घेतला. गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबीरात 378 ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामधील 67 लाभार्थींवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होणार आहे. तसेच यावेळी 43 गरजू ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे सदस्य व नागरदेवळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment