बेवड्याकडून मंदिरातील मूर्तीची विटंबना; भाविकांनी दिला चोप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- संगमनेर शहरातील परदेशपुरा परिसरात असणार्‍या सटूआईच्या मंदिरातील मुर्तीची विटंबना एका मद्यपीने केल्याची घटना उघडकीस आली आहे.

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या या बेवड्याला परिसरातील भाविकांनी बेदम चोपले आहे.दरम्यान हा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.24) रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती समजते आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर शहरातील परदेशपुरा परिसरात सटुआईचे मंदीर आहे. या मंदिरात भाविक नेहमीच देवदर्शन करण्यासाठी येत असतात.

काल सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास एक मद्यपी मंदिराजवळ आला. मंदिराजवळ कोणीच नसल्याने त्याने मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने मुर्तीला दगड मारून मुर्तीची तोडफोड केली.

दिवाबत्ती करण्यासाठी भाविक मंदिरात आल्याचे पाहून त्याने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र भाविकांनी त्याला पकडले व चांगला चोप दिला. दरम्यान या घटनेमुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सदर मद्यपीला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Leave a Comment