जिल्हाधिकारी डॉ.भोसले म्हणाले नियम पाळा लॉकडाऊन टाळा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी झाल्याने नागरिकात मास्क न लावणे, गर्दी करणे अशी ढिलाई आढळून येत आहे. कोरोना पूर्णत: नष्ट झालेला नाही. व्हॅक्सीनेशन आले असले तरी गाफील राहणे उपयोगाचे नाही.राज्यातील काही भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.

तरी, लॉकडाऊन टाळायचे असेल तर जिह्यातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

कोरोना परिस्थितीच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रदीर्घ आढावा बैठक घेतली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित,

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे,जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाने आदी उपस्थित होते.

या बैठकीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा जिल्हाधिकारी यांनी सविस्तर आढावा घेतला. जारी करण्यात आलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश महसूल, पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागांना देण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, राज्यात विदर्भातील अमरावती, वर्धा तसेच पुणे,मुंबई परिसरात कोरोना बाधितांचे प्रमाण वाढल्याचे निष्पन्न होत आहे.या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती विचारात घेता साशंकता निर्माण होणे सहाजिक आहे.

याचे भान बाळगून जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे नागरिकात मास्क वापरा विषयी गांभीर्य राहिले नसल्याचे जाणवते आहे. तसेच लग्न व इतर कार्यक्रमांना गर्दी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यातील इतर भागात कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात मंगल कार्यालय संचालकाची बैठक घेत निर्देश दिले आहेत.

तसेच निश्चित प्रमाणापेक्षा जास्त गर्दी आढळली तर तहसीलदार, उपविभागीय अधिकारी,महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या प्रशासनास कारवाई संबंधीचे आदेश जारी केले आहेत. मर्यादेपेक्षा लग्न समारंभात जास्त गर्दी आढळली तर कार्यालयाचा परवाना रद्द करीत दंडात्मक कारवाई देखील केली जाईल.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱयांकडे जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. नागरिकांनी देखील परिस्थितीचे भान बाळगून मास्कचा वापर करावा, अनावश्यक गर्दी टाळावी. तसेच कारवाईची वेळ येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्हावासीयांना केले आहे.