अजून भयावह परिस्थिती येऊ शकते, पंधरा दिवस कडकडीत लॉकडाऊन करा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल, तर किमान पंधरा दिवस संपूर्ण कडकडीत लॉकडाऊन पाळणे अत्यंत गरजेचे आहे.

किराणा, भाजीपाला बंद झाल्यानंतर जनतेची अडचण होणार आहे, यात शंका नाही. पण आज कोरोना वाढीचा वेग व मृत्युचे प्रमाण बघता आपणच कठोर निर्णय घेऊन प्रत्येकाचा जीव सुरक्षित ठेवला पाहिजे, असे मत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केले.

वहाडणे म्हणाले, राजकीय दबावामुळे आज सुरू असलेला लॉकडाऊन प्रभावी ठरलेला दिसत नाही. काही व्यवहार सुरू असल्याने लोक घराबाहेर पडणार व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणारच आहे.

शंभार टक्के संचारबंदी-व्यवहार बंदी हाच एकमेव उपाय सध्या तरी दिसतो. दवाखाने, औषधे, लॅब, सर्व वैद्यकीय सेवा अती आवश्यकच आहेत. सकाळी अकरापर्यंत दूधविक्री व्हावी. सर्वांच्याच कितीही अडचणी वाढणार असल्या तरीही सहन करावे लागणार आहे,

अन्यथा कोरोनामुळे कुणाचा कधी घात होईल, हे सांगताच येत नाही. गरीब-सर्वसामान्य कुटुंबातील कुणी कोरोनामुळे अॅडमिट झाले, तर घरदारच विकावे लागेल. इतके महागडे उपचार करावे लागतात.

अशावेळी त्या परिवाराला कोण आर्थिक मदत करणार, असा सवाल त्यांनी केला. आज सर्व शासकीय यंत्रणा तोकडी पडत आहे. बेड नाहीत, ऑक्सिजन नाही, इंजेक्शन नाहीत असे संकट आजच आहे. यानंतर अजून भयावह परिस्थिती येऊ शकते.

कारण अनेक शासकिय अधिकारी-कर्मचारीच कोरोनामुळे जायबंदी झालेत. यंत्रणाच कोसळून पडली तर काय?, असा सवाल त्यांनी व्यक्त केला. नागरिकांचे जिवीत सुरक्षित रहावे म्हणून मी माझे मत मांडले आहे.

अशा काळात राजकीय विचार न करता सर्वांनी एकजुटीने कोरोना विरोधात लढले पाहिजे. हॉस्पिटल-मेडिकल-लॅब-वैद्यकीय सुविधा-दूध वगळता इतर सर्व व्यवहार किमान १५ दिवस शंभर टक्के बंद ठेवावेत, असे माझे मत आहे.

तरीही केवळ नागरिकांना जास्त अडचणीचे होऊ नये म्हणून आठवड्यातून फक्त एक दिवस दर मंगळवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत किराणा-भाजीपाला व्यवसाय सुरू ठेवावेत.

मागील वर्षाप्रमाणे अनेक समाजसेवक,स्वयंसेवी संस्था, संघटना, सहकारी संस्था,नेते,राजकिय पक्ष गरजूंना फुड पॅकेट देऊन आधार देऊ शकतात, असेही नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|