जनता कर्फ्यू हा स्वयंस्फुर्तीने न होता राजकीय इव्हेंट झाला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- गेली अनेक दिवस बंद असलेली व्यापाऱ्यांची दुकाने नुकतीच काही दिवसांपूर्वी खुली करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.

मात्र राहाता शहरात जनतेवर सक्ती नको ज्या व्यावसायिकांना दुकाने सुरू ठेवायची आहेत त्यांनी ती खुली ठेवावीत आणि ज्या व्यापार्‍यांना बंद ठेवायची आहे त्यांनी बंद पाळावा, असे आवाहन उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी करत गांधिगीरी आंदोलन केले.

राहाता शहरात गुरूवारी जनता कर्फ्यू तर इतर दिवस दुकाने स. 7 ते 4 वाजेपर्यंत सुरू करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. बुधवारी व्यवसायिकांची बैठक घेत व्यवसायिकांनी उत्सफुर्तपणे 4 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास पाठिंबा दिल्याचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी जाहीर केले.

मात्र या बैठकीत ठराविक व्यापार्‍यांना बोलावल्याचा आरोप उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी केला आहे. नगरपरिषदेच्या निर्णयाचा निषेध करत जनता कर्फ्यू असताना पठारे यांनी नगरपरिषदेसमोरच चहाचे दुकान थाटून चहा वाटप केले.

दरम्यान जिल्ह्यातील अनेक तालुक्यात तसेच गावांमध्ये जनता कर्फ्यू हा स्वयंस्फुर्तीने न होता राजकीय इव्हेंट झाला आहे. यातच राहाता नगरपालिका प्रशासनावर सत्ताधारी भाजपचा दबाव असल्याने बोटावर मोजण्या इतपत व्यापारी वर्गाला सामोरे करून प्रशासन छोट्या व्यवसायिकांना वेठीस धरत असल्याचा

आरोप करत उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी जनता कर्फ्यू असताना नगरपरिषद कार्यालयासमोर चहा विकून गांधीगिरी केली. एकिकडे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस लॉकडाऊनला विरोध करतात तर दुसरीकडे राहाता नगरपालिकेत भाजपची सत्ता असून

देखील लॉकडाऊन, जनता कर्फ्यू लावण्यास नागरिकांना भाग पाडले जात आहे. सक्ती न करता व्यापारी हित लक्षात घेऊन सर्व समावेशक निर्णय घ्यावा. काही कथित व्यापारी वर्गावर राजकीय दबाव टाकून सक्ती होता कामा नये अशी मागणी पठारे यांनी केली आहे.