उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीबद्दल माजीमंत्री राम शिंदेंचा खुलासा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :-  आमदार रोहित पवार यांचे राजकीय विरोधक असलेले भाजपचे नेते माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासोबत शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर गोपनीय बैठक झाली. दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. मात्र, तो तपशील बाहेर आलेला नाही.

भेट नक्की कशासाठी ? शनिवारी कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाली. ही भेट नक्की कशासाठी होती, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

कट्टर विरोधक भेटले का ? अंबालिका कारखाना आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात येतो. राम शिंदे हे रोहित पवार यांचे कट्टर विरोधक असून त्यांना पराभूत करत रोहित पवार आमदार झाले.

त्यामुळे रोहित पवार यांचे कट्टर विरोधक आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू राम शिंदे यांची अजित पवार यांनी भेट घेतल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.

भेटीविषयी तर्कवितर्क :– राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जातात. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.आता अजित पवार आणि राम शिंदे यांच्या भेटीमागेही काही राजकारण आहे का, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

अर्धा तास बंद दाराआड चर्चा :- अजित पवार नेहमी कारखान्यावर येत असतात. त्यांचा हा दौरा गोपनीय असतो. अजित पवार शनिवारी सकाळी या कारखान्यात उपस्थित असताना राम शिंदे कारखान्यात पोहोचले.या दोन नेत्यांमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली.

राजकीय वर्तुळात तर्कवितर्क :- राज्यात सध्या राजकीय भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यात आता अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात बंद दाराआड भेट झाल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

निरोप घेऊन भेट ? राम शिंदे हे फडणवीसांचे विश्वासू सहकारी मानले जातात. त्यांचाच एखादा निरोप घेऊन तर राम शिंदे अजित पवारांना भेटले नाहीत ना? अशीही चर्चा सुरु आहे. राम शिंदे हे नगरच्या राजकारणात वेगळे पडल्याचं चित्र गेल्या काही काळात पहायला मिळतं आहे.

राम शिंदेंचा खुलासा – दरम्यान माध्यमांतून ह्या बाबत बातम्या आल्यानंतर मात्र राम शिंदे यांनी हे वृत्त खोटे असून ‘अशी भेट झालीच नाही. सर्व अफवा आहेत. मी कर्जतला नसून पुण्यात आहे’ असे ते म्हणाले आहे. मात्र, त्यांनी ह्या भेटीबद्दल तपशीलवार बोलणे टाळले आहे.

दबावाचं राजकारण ? कर्जतमध्ये पराभव झाल्यानंतर राम शिंदे पक्षातही फार कुठे दिसत नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर दबावाचं राजकारण करण्यासाठी तर अशा भेटीगाठी होत नाहीयत ना? असाही एक चर्चेचा सूर आहे.

जलयुक्त शिवार योजनेची चौकशी :- भाजप सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेची सध्या चौकशी सुरू आहे. हे खाते शिंदे यांच्याकडे असल्याने तो संदर्भ या भेटीला आहे का? शिंदे यांच्याशी चर्चा करून पवार हे नगर जिल्ह्यात काही वेगळे आडाखे बांधू पाहत आहेत का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

जवळीक करण्याचा प्रयत्न आहे का? शिंदे धनगर समाजाचे नेतृत्व करतात. त्यामुळे त्यांच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न आहे का?, असे विचारले जात आहे. राष्ट्रवादीच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने खासगीत बोलताना ही केवळ सदिच्छा भेट आहे, असे सांगितले आहे

भेटीबाबत गुप्तता का?  कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. पण साखर कारखान्यावरच चर्चा करायची असेल तर भेटीबाबत गुप्तता का?असा सवालही चर्चिला जातोय.

भेट झाल्याचं स्पष्टपणे नाकारलं :- दोन्ही नेत्यांनी भेटीबाबत कुठेही वाच्यता केलेली नाही. त्यांच्या निकटवर्तीयांनाही याबाबत फार माहिती नसल्याचं दिसतं आहे. विशेष म्हणजे राम शिंदे यांनी अशी कुठलीही भेट झाल्याचं स्पष्टपणे नाकारलं आहे.