साईबाबा संस्थांनवर राजकीय व्यक्तीची नियुक्ती नको

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी अनेक वेळा राजकीय व्यक्तींची नेमणूक झाली आहे. त्यात अनेक गैरप्रकार व आर्थिक भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आल्याने या संस्थानची बदनामी झाली आहे.

यामुळे साई संस्थानवर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीची नियुक्ती करू नये, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी केली आहे. शिर्डी संस्थान हा राजकीय पुढाऱ्यांचा अड्डा बनला आहे.

त्यामुळे अनेक निविदा प्रक्रियेत करोडो भ्रष्टाचार झाला आहे. जगभरात पसरलेल्या साईबाबा भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शिर्डी संस्थानवर कोणत्याही राजकीय व्यक्तीची नेमणूक न होता, सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती करावी.

तसेच शिर्डी हे देशभरातील सर्व धर्मियांचे श्रद्धा स्थान असून, करोडो साईभक्त दरवर्षी नित्यनियमाने दर्शनासाठी येतात व भक्ती भावाने अब्जावधी रूपयांचे मनोभावे दान करतात. मात्र त्याचा योग्य विनियोग न झाल्याने शिर्डी येथे पाहिजे त्या सोई सुविधा आजही निर्माण झाल्या नाहीत.

नगर जिल्ह्यातील भ्रष्ट राजकीय पुढाऱ्यांचा पुनर्वसन व आर्थिक संधी देण्यासाठी या संस्थानचा अनेक वेळा गैरवापर झाला आहे. प्रस्थापित, साखर सम्राट, मद्य सम्राट यांच्या नियुक्त्या होऊ नयेत,

अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत भोस यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून बिगर राजकीय व्यक्तींच्या काही नावांची यादीच दिली आहे.