इतका पाऊस झाल्यानंतरच पिकांची पेरणी करा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- संगमनेर तालुक्यात खरीप पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले असून शासनानेही बियाणे व खतांचे नियोजन केले आहे. अनुदानित बियाणे वाटपाचे कामे सुरु केले आहे. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

८० ते १०० मिमी. पाऊस झाल्यानंतर सोयाबीन व इतर पिकांची पेरणी करण्यात यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी केले. संगमनेर तालुक्यात एकूण लागवडीलायक क्षेत्र १, १३, ५१० हेक्टर आहे. यात बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, कांदा, कापूस, ऊस या पिकांची लागवड होते.

त्याच प्रमाणे तूर, मूग, उडीद आदी कडधान्य खरिपात घेतली जातात. २०२०-२१ मध्ये या सर्व पिकांचे ७००६५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे उद्धिष्ट कृषी विभागाने ठेवले असून एकूण ११, ९५६ क्विंटल बियाणांचे वाटप करण्यात येणार आहे.

बीज प्रक्रिया जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावी. खतांची १० टक्के बचत करावी. सोयाबीन पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीने करावी. कृषी विभागाने खतांचे नियोजन केले असून युरिया, डीएपी, एसएसपी, एमओपी व इतर खतांची १७१०४ मे. टन मागणी असून १४१५९ मे. टन खतांची उपलब्धता कृषी विभागाने केली आहे.

संगमनेर तालुक्यातील शेतकर्यांनी ऑनलाइन माहिती भरुन महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना २०२१ अंतर्गत फळबाग लागवड योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जाव्दारे मागणी नोंदवावी.तालुक्यात एकूण ४५ शेती शाळाअसून त्या माध्यमातून कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना बांदापर्यंत पोहचविण्याचे काम कृषी विभागाकडून जोमात सुरू आहे.

याशिवाय शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागी व्हावे. तसेच मयत शेतकऱ्यांच्या वारसास २ लाख रुपये मिळण्यासाठी गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महाडिबीटी प्रणाली योजनेंतर्गत यांत्रिकी शेतीला प्राधान्य देण्यात येत आहे.

ट्रॅक्टर, शेती औजारे, ठिबक सिंचन, कांदा चाळ, पीव्हीसी पाईप, संरक्षित शेती या सारख्या योजनांमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, ऑनलाइन पद्धतीने अर्जाची नोंद करण्यात येत असून याबाबत अधिक माहिती कृषी विभागाकडून घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शेंडे यांनी केले.