येत्या काही दिवसात काय असणार जिल्ह्यात पावसाची स्थिती? जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :-  मोसमी पाऊस 3 जूनला केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर तीनच दिवसांत महाराष्ट्र गाठला आणि अनेक ठिकाणी मान्सूनच्या सरी देखील कोसळल्या.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातावरण होते. मात्र अचानक काही दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. दरम्यान नगरसह राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाच्या केवळ हलक्या सरींची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणीच पाऊस होणार आहे. 5 आणि 6 जुलैला या दोन्ही विभागांत तुरळक भागांत मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जिल्ह्यात 2 लाख 61 हजार 469 (सरासरीच्या 58 टक्के) पेरण्या झाल्या असून पावसाने दडी मारल्याने आणि आणखी काही दिवस तरी त्याला जोर मिळणार नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.

राज्यामध्ये सध्या पावसाने दडी मारली आहे तसेच गेल्या 14 ते 15 दिवसांपासून त्याने कोणतीही प्रगती केलेली नाही.

आणखी काही दिवस तो रखडण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रात आणखी आठ दिवस तरी मोठा पाऊस होणार नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. परिणामी पीक-पाण्याच्या चिंतेत भर पडली आहे.