कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेला सूचना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांची चाचणी करावी. जितक्या लवकर अशा व्यक्तींना शोधून त्यांच्या चाचण्या केल्या जातील तितके लवकर आपण जिल्ह्यातील प्रादुर्भाव नियंत्रणात आणू. त्यामुळे यासाठी आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. उपजिल्हाधिकारी रोहिणी नऱ्हे, जिल्हा रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बांगर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दहिफळे,

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे हे जिल्हा मुख्यालय येथून तर उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक हे तालुका स्तरावरून यात सहभागी झाले होते.

जिल्हयात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांना शोधणे आणि त्यांच्यावर उपचार सुरू करणे महत्वाचे आहे. त्याच बरोबर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधणे अधिक महत्वाचे आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संसर्ग साखळी तोडणे आवश्यक असून त्यादृष्टीने यंत्रणांनी कार्यवाही करण्याची सूचना यावेळी त्यांनी दिली.

रुग्ण वाढ होत असताना सर्व तालुकास्तरीय यंत्रणांनी कोविड केअर सेंटर (सीसीसी) आणि डिस्ट्रीक्ट कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) अद्यावत करणे अपेक्षित आहे. तेथील सुविधांची पाहणी करून आवश्यक तयारी त्याठिकाणी असणे अपेक्षित आहे. ज्या भागात जास्त रुग्ण आढळून येत आहे तेथे कडक प्रतिबंध लावण्याबाबत यापूर्वीच सूचना दिल्या आहेत.

त्याची अंमबजावणी काटेकोरपणे होणे आवश्यक आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. नीचीत यांनी सांगितले. प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कडक कारवाईचे निर्देश यापूर्वीही दिले आहेत. असे असतानाही जिल्ह्याच्या काही तालुक्यात काटेकोरपणे कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत नसल्याने कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे.

त्यामुळे आधी कारवाई करावी, असे ते म्हणाले. दैनंदिन आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवावी. त्याचबरोबर केल्या जाणाऱ्या चाचण्यांची माहिती पोर्टलवर वेळेवर अपलोड करण्याची सूचना यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी केली.

वाढत्ता संसर्ग रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्यांनी त्यांची जबाबदारी गांभीर्याने पार पाडून गाव कोरोनामुक्त राहील, यासाठी पुढाकार घ्यावा.

गावस्तरावरील अधिकारी-कर्मचारी यांनीही स्थानिक पातळीवर दक्ष राहणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाई अपेक्षित आहे. सुपर स्प्रेडर रोखण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी तसेच महानगरपालिका क्षेत्रातही नेमलेल्या विविध पथकांनी त्यांच्यावर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.