कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनाच्या कोर्टात टोलवला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे प्रशासन पुन्हा एकदा सतर्क झाले आहे. जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत असल्याने प्रशासनाने कठोर निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहे.

याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनाला कोरोना संसर्ग रोखण्याचे आदेश दिले आहे. जामखेड तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे

यांनी जामखेड तालुक्याचा दौरा केला अन् फक्राबाद येथे आढावा बैठक घेऊन गावोगावच्या सरपंचांकडून कोरोनाची स्थिती जाणून घेतली. यावेळी कोरोना संसर्ग वाढण्यासाठी कारणीभूत ठरत असलेल्या विविध कारणांचा पाढाच सरपंचांनी जिल्हाधिकारी महोदयांसमोर मांडला.

सरपंचांनी सांगितलेल्या सर्व कारणांची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आणि कडक कार्यवाहीचे फरमान सोडले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीचा चेंडू जिल्हाधिकारी महोदयांनी तालुका प्रशासनाच्या कोर्टात टोलवला आहे.

त्यामुळे तालुका प्रशासन कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी काय कठोर उपाययोजना राबवणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. चाचणी न करता कोरोनाबाधितांवर जी खासगी रुग्णालये उपचार करीत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी.

ज्या गावांमध्ये बाधितांची संख्या वाढली आहे, ती गावे तातडीने बंद करा. स्थानिक प्रशासनास जे कुणी अडथळा आणत असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी तालुका प्रशासनाला दिले.