भारतातील एक दिग्गज तसेच बडा उद्योग समूह म्हणून अदानी ग्रुपकडे पहिले जाते.
अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी पाऊले रोवणारे हा ग्रुप लवकरच आता एका नव्या सर्व्हिस क्षेत्रात एंट्री करणार आहे.
नुकताच गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्रायझेसने व्यावसायिक ड्रोन बनवणाऱ्या बेंगळुरूस्थित एका स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.
अदानी समूहाने जनरल एरोनॉटिक्समध्ये गुंतवणूक करून ड्रोन क्षेत्रात प्रवेश केला आहे. आता ड्रोन क्षेत्रानंतर अदानी समूह नवनवीन क्षेत्रात पदार्पण करताना दिसत आहे.
याचाच एक भाग म्हणून अदानी समूह लवकरच विमान क्षेत्रात देखील प्रवेश करण्याची शक्यता आहे.
देशातील सात विमानतळांचे व्यवस्थापन करणारा अदानी समूह मुंबईस्थित एअर वर्क्स ग्रुपमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.
एअर वर्क्स ग्रुप लुफ्थांसा, तुर्की एअरलाइन्स, फ्लाय दुबई, एतिहाद, आणि व्हर्जिन अटलांटिक यासह एक डझनहून अधिक विदेशी विमान कंपन्यांना सेवा पूरवतो.
एअर वर्क्स ग्रुप ही विमान सेवा क्षेत्रातील भारतामधील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याच्या प्रयत्नात अदानी ग्रुप असल्याची बातमी समोर येत आहे.
सध्या अदानी समूहाकडे देशातील सात विमानतळांचे व्यवस्थापन आहे. त्यामध्ये अहमदाबाद, लखनौव, तिरुअनंतपुरम, जयपूर, गुवाहाटी, मुंबई आणि मंगळुरू विमानतळाचा समावेश आहे.