कोरोना काळात जशी माणसांसाठी क्वारंटाइन सेंटर सुरू केली होती, तशी लम्पी चर्मरोग बाधित जनवारांसाठीही करण्याची गरज निर्माण झाली आहे.
यातील पहिले केंद्र नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात सुरू होत आहे. अर्थात ते सरकारी नव्हे तर निवडुंगे येथील बळीराजा फाऊंडेशनतर्फे स्वखर्चाने चालविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्याला मंजुरी दिली आहे.
या संस्थेला परवानही देताना काही अटी घालण्यात आल्या आहेत. हे विलगीकरण केंद्र फक्त अहमदनगर जिल्हयातील पशुधनासाठी राहील.
लगतच्या किंवा इतर कोणत्याही जिल्हयातील लम्पी चर्म रोग बाधीत जनावरे या विलगीकरण केंद्रात दाखल करुन घेता येणार नाहीत.
विलगीकरण केंद्रात दाखल झालेल्या जनावरांची माहिती संबंधित तलाठी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक राहील.
जनावरासाठी रोज किमान तीन किलो कोरडा चारा व ९ किलो ओला व हिरवा चारा अर्धा किलो उच्च प्रतीचे किमान २० टक्के प्रथिने असलेले पशुखाद्य देणे बंधनकारक राहील
अश्या तब्बल २६ प्रकारच्या अटींची पूर्तता केल्यानंतरच सदर विलगीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, असे आदेशात म्हटले आहे.