पुण्यातील ‘या’ मेट्रो मार्गाच्या आराखड्यात मोठा बदल, नवीन स्टेशनं पण ऍड केले जाणार

Published on -

Pune Metro News : पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक पट्ट्यांना मेट्रोने जोडण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या निगडी–चाकण मेट्रो प्रकल्पाला आता नवे वळण मिळाले आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) यांनी यापूर्वी तयार केलेल्या प्राथमिक आराखड्यात बदल करत सुधारित आराखडा तयार करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या विविध सूचनांच्या पार्श्वभूमीवर हा सुधारित आराखडा तयार केला जात असून पुढील महिनाभरात अंतिम अहवाल सादर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या पिंपरी–स्वारगेट मार्गावर मेट्रो धावत असून, या मार्गाचे निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात भक्ती-शक्ती चौक ते चाकण दरम्यान स्वतंत्र मेट्रो मार्ग प्रस्तावित केला आहे.

जुन्या आराखड्यानुसार, हा मार्ग पूर्णपणे उन्नत (एलिव्हेटेड) पद्धतीचा असणार असून, एकूण ३१ स्टेशनांचा समावेश करण्यात आला होता. यात पिंपरी-चिंचवड परिसरातील २५ तर चाकणमधील ६ स्टेशनांचा समावेश होता.

प्रकल्पाचा अंदाजे खर्च १०,३८३ कोटी ८९ लाख रुपये इतका असेल, असे पूर्वी सांगितले गेले होते. महामेट्रो सुधारित आराखड्यात काही नवीन गावांचा समावेश आणि काही नवीन स्टेशनांची भर घालण्याबाबत अभ्यास करत आहे.

मार्ग वाढल्यास किंवा स्टेशन वाढल्यास खर्चातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रत्येकी १० टक्के निधी देणार आहेत, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वाटा १५ ते २० टक्क्यांदरम्यान असेल. उर्वरित ६० टक्के निधी कर्जातून उभारण्याचे संकेत मिळत आहेत.

जुन्या आराखड्यानुसार भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक, ट्रान्सपोर्टनगर, गणेशनगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळे, ताथवडे, भूमकर चौक, वाकड, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, संत तुकारामनगर, वल्लभनगर, गवळीमाता चौक, मोशीतील भारतमाता चौक, चिंबळी फाटा, बर्गेवस्ती, नाणेकरवाडी ते चाकण अशी स्टेशनांची साखळी प्रस्तावित होती.

आता आसपासची आणखी काही गावे आणि महत्वाच्या चौकांचा समावेश होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, “प्राथमिक आराखड्यातील सादरीकरणानंतर प्राप्त सूचनांनुसार सुधारित आराखड्याची आखणी सुरु असून,

नवीन स्टेशन किंवा गावे जोडल्यास प्रकल्प खर्चात वाढ अपेक्षित आहे.” या प्रकल्पामुळे औद्योगिक आणि नागरी भागांमधील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe