Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न फारच बिकट बनत चालला आहे. दरम्यान शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. सध्या स्थितीला कोकणातून पुण्यात प्रवेश करताना काही ठिकाणी नागरिकांना मोठी अडचण होते.
विशेषता चांदणी चौक परिसरात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. दरम्यान आता हिच वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

महापालिकेने चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर व्हावा यासाठी एक नवीन उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्याचा निर्णय घेतला असून हा प्रकल्प जवळपास 203 कोटी रुपयांचा राहणार आहे.
हा प्रकल्प महापालिकेच्या इस्टिमेट कमिटी कडून मंजूर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आज आपण या प्रकल्पाची सविस्तर माहिती या लेखातून समजून घेणार आहोत. पुणे शहराच्या पश्चिमेकडील महत्त्वाच्या प्रवेशद्वारांपैकी एक म्हणजे चांदणी चौक ते भूगाव मार्ग.
पण या मार्गावरील वाहतूक कोंडी हा अलीकडे फारच चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यान याच परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिका आणि पीएमआरडीएकडून महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत.
यामुळे भविष्यात या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावणार नाही असा विश्वास व्यक्त होतोय. आता या मार्गावर उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर आणि नदीवर नवीन पूल विकसित केला जाणार आहे.
ह्या प्रकल्पाला इस्टिमेट कमिटीने मंजुरी दिली असल्याने येत्या काळात प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. महत्त्वाची बाब अशी की या कामांसाठी तब्बल 203 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, आवश्यक जमिनीपैकी किमान 80 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे.
दरम्यान आता या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. चांदणी चौक ते पीरंगूटदरम्यान अलीकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. येथील सतत वाढणारी वाहतुक पाहता येत्या काळात या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
दरम्यान, भूगावपर्यंत महापालिकेची हद्द दोन किलोमीटरपर्यंत असून विकास आराखड्यातील 60 मीटर रुंद रस्त्याचा विस्तार करण्याचे काम अगदीच युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यानंतर पीएमआरडीएचा प्रस्तावित रिंग रोड या मार्गाला जोडला जाणार आहे.
म्हणजे भविष्यात या भागातील वाहतूकप्रवाह आणखी वाढणार आहे. विशेष म्हणजे या भागातील लोकसंख्या देखील सातत्याने वाढत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता येथील कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने हा प्रकल्प मंजूर केला आहे.
या अंतर्गत दोन टप्प्यांत पूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्याचा निर्णय घेतला गेला आहे. सदर प्रकल्पानुसार, पीव्हीपीआयटी कॉलेज चौकात 430 मीटर लांबीचा आणि 23.2 मीटर रुंदीचा ग्रेड सेपरेटर उभारला जाणार आहे. यातील 120 मीटर भाग आरसीसी रचनेचा असेल व यासाठी 27 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
तसेच एम्बोसिया चौक व पाटीलनगर चौक दरम्यान 870 मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन असून या कामाचा खर्च 82 कोटी रुपये असेल. हा पूल चालू झाल्यानंतर चांदणी चौक–भूगाव दरम्यानचा प्रवास वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा महापालिकेचा दावा आहे.
याशिवाय राम नदीवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 30 मीटर लांबीचा आणि 70 मीटर रुंदीचा नवीन पूल बांधण्यात येणार आहे. सर्व प्रकल्पांसाठी प्रथम 80 टक्के जागेचे भूसंपादन पूर्ण केले जाईल आणि त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल. या प्रकल्पांमुळे या संपूर्ण पट्ट्यातील वाहतूक सुलभ होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.













