पगार मागितला म्हणून हाॅटेल मालकाने आचाऱ्याला केली लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल

राहुरीमध्ये एका आचाऱ्याने एक महिन्याचा पगार मागितल्याने हॉटेल मालकाने त्याला शिवीगाळ व काठीने मारहाण केली. त्रिलोक सिंग यांच्या फिर्यादीवरून आरोपी कन्हैयालाल कथुरिया याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Published on -

Ahilyanagar News: राहुरी- एक महिना केलेल्या कामाचा पगार मागितला म्हणून हॉटेल मालकाने आचाऱ्याला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्याने व काठीने मारहाण केली. राहुरी शहर हद्दीत शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिलोक सिंग (वय ६५, रा. चितोडगड, उत्तराखंड), हल्ली रा. शुभकिर्ती हॉटेल, राहुरी बुद्रुक यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण नगर ते मनमाड रोडवरील राहुरी येथील शुभकिर्ती हॉटेलमध्ये साऊथ इंडीयन कुक म्हणून सुमारे ४ महिन्यांपासून काम करीत आहे. सदर हॉटेल कन्हैयालाल कथुरिया याने चालवण्यास घेतले आहे. 

पगार मागितला म्हणून मारहाण

६ जून रोजी सकाळी ८ वाजता आपण हॉटेलवर कुकचे काम करीत होतो. त्यावेळी कन्हैयालाल कथुरिया तेथे आला व मला शिवीगाळ केली. मी त्याला ‘तुम्ही मला विनाकारण शिवीगाळ का करता’, असे विचारल्याचा राग आल्याने त्याने मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तु इथे कामावर राहायचे नाही, निघून जा असे म्हणाला. त्यावर मी त्याला म्हणालो की, ‘माझे कामाचे एक महिना पाच दिवसांचे २८ हजार ५०० रुपये तुमच्याकडे आहे.

ते मला द्या, मी तुमचे काम सोडून जातो, असे म्हणालो असता, त्याने पुन्हा मला शिवीगाळ केली व म्हणाला ‘तुला तुझ्या कामाचे पैसे देणार नाही, तु माझे विरुद्ध काय करायचे ते कर’, असे म्हणत काठीने मारहाण केली. 

मारहाण करत दिली धमकी

हॉटेलमधून धक्के देऊन बाहेर काढले. तसेच तु परत येथे जवळपास दिसला तर तुझ्याकडे पाहील, अशी धमकीही दिली. या घटनेनंतर त्रिलोक सिंग यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी कन्हैयालाल कथुरिया (रा. राहुरी बुद्रुक) याच्यावर मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!