गुलमोहर रस्त्यावर पारिजात चौकातील ड्रेनेज लाईन कामासाठी १० दिवस वाहतुकीच्या मार्गात बदल रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकात १५० झाडे लावणार

Published on -

अहिल्यानगर – शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून सावेडी टेलिफोन ऑफिस ते पारिजात चौक ते एकविरा चौक ते तपोवन रस्ता या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या मार्गावर अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन टाकण्यात येत आहे.

गुलमोहर रस्त्यावर पारिजात चौक येथे या कामाला सुरुवात झाली आहे. ८ जून ते १८ जून या कालावधीत हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे दहा दिवस या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे.

आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यातून राज्य शासनाने या रस्त्याच्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून ड्रेनेज लाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. या ड्रेनेज लाईनमुळे पारिजात चौक परिसरातील वसाहतींमध्ये साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.

पुढील दहा दिवस हे काम सुरू राहणार आहे. या कामात काही ठिकाणी झाडे अडथळा ठरत आहेत. त्यातील शक्य तेवढी झाडे वाचवून काम मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. काही झाडे अपरिहार्य परिस्थितीत काढावी लागणार आहेत. मात्र, या रस्त्याच्या कामात दीड मीटर रुंदीचे रस्ता दुभाजक प्रस्तावित आहे. त्यात सुमारे दीडशे झाडे लावण्यात येणार असल्याचेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

गुलमोहर रोडवरील पारिजात चौक परिसरात अंडरग्राउंड ड्रेनेजचे काम होणार असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी १० दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सुरभी हॉस्पिटल ते कलानगरकडे जाण्यासाठी गुलमोहर रोड येथील आमदार संग्राम जगताप यांचे कार्यालय – हनुमान मंदिर रामकृष्ण कॉलनी – अष्टविनायक अपार्टमेंट समता नगर – झालानी हॉस्पिटल मार्गे गंगा उद्यान असा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. नागरिकांनी या मार्गाचा वापर करून गैरसोय टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!