Ahmednagar News : रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळच्या गोंधेवाडी येथील रवींद्र वसंत गोंधे (वय २७) याला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी २० वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील एका भागातील अल्पवयीन मुलगी १२ डिसेंबर २०१८ रोजी शाळेत जात असताना रवींद्र गोंधे याने ओळखीचा गैरफायदा घेत तिला शाळेत सोडतो, असे सांगून मोटारसायकलवर बसवून घारगावच्या दिशेने नेले. शाळेकडे न नेता घारगावच्या दिशेने नेत असल्याचे लक्षात येताच मुलीने आरडाओरडा केला.
आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी देत गप्प बसण्यास सांगितले व तिला चाकणजवळ असलेल्या वासुली या गावी त्याने अगोदरच भाड्याने घेतलेल्या खोलीवर नेले. तेथे व अन्य वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीने तिला नेत १२ डिसेंबर २०१८ ते १ जून २०२० या कालावधीत तिला लग्नाचे खोटे आमषि दाखवून, कोणाला काही सांगितलं तर जिवे मारण्याची धमकी देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
त्यानंतर १ जून २०२० रोजी या मुलीला घारगावच्या पुलाजवळ आणून सोडले. घरी आल्यानंतर पीडित मुलीने घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आरोपीविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
आरोपीविरोधात संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जयंत दिवटे यांनी पीडित मुलीच्या वतीने न्यायालयासमोर बाजू मांडत या खटल्यात आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून या घटनेचे गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपीचे वकील आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जयंत दिवटे यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले.
मुलीस फुस लावून पळून नेत अत्याचार केल्याप्रकरणी गोंधे याला २० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी, बाल लैंगिक अत्याचार पोक्सोअंतर्गत पाच वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास चार महिने सक्तमजुरी, भारतीय दंड विधान कलम ३३६ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरी,
भारतीय दंड विधान कलम ३६६ अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार प्रवीण डावरे, पोलीस कॉन्स्टेबल स्वाती नाईकवाडी, दिपाली दवंगे व प्रतिभा थोरात यांनी सहाय्य केले.