जेऊर येथील शेतकऱ्याने मुगाच्या पिकात तणनाशक औषधाची फवारणी केल्यानंतर संपूर्ण मुगाचे पिकच जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्याकडून औषध विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जेऊर येथील शेतकरी विजय आदिनाथ फुलारे यांनी आपल्या गट नंबर १३७/१ मधील मुगाच्या एक एकर क्षेत्रावर तणनाशक औषधाची फवारणी केली होती. तणनाशक औषध अहमदनगर येथील मार्केट यार्ड परिसरातील नामांकित दुकानातून खरेदी केले होते. फवारणी केल्यानंतर मुगाचे पिकच जळून गेले आहे.
त्याबाबत संबंधित दुकानदाराने औषध कंपनीच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पाठवले होते. त्यानंतर कृषी विभागाच्या वतीने देखील झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात आली आहे.
याबाबत शेतकरी विजय फुलारे यांनी कृषी विभागाकडे निवेदन देऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करून औषध विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. फुलारे हे अल्पभूधारक शेतकरी असून दुकानदाराच्या चुकीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्याकडून करण्यात आला आहे.
शेतकरी विजय फुलारे यांनी सांगितले की, संबंधित दुकानदाराच्या सल्ल्याने तसेच मार्गदर्शनानेच तणनाशक औषध खरेदी केले होते. त्यांनी सांगितलेल्या प्रमाणानुसार औषध फवारणी केली.
तरी देखील मुगाचे पीक जळून गेले आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करावा तसेच झालेल्या नुकसानीचा मोबदला तात्काळ मिळण्याची मागणी फुलारे यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे