अहमदनगर बातम्या

पारनेरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, दोन मंदिरांतील दानपेट्या फोडल्या

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील खंडोबा मंदिरातील व वासुंदे येथील भाऊसाहेब महाराज मंदिरातील नवीनच बसवलेली दानपेट्या चोरट्यांनी फोडून त्यातील ऐवज लंपास केला.

दैठणे गुंजाळ येथील चोरीची घटना शुक्रवारी पहाटे घडली असून, चोरी करणारे दोघे जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. गावातील खंडोबा मंदिरात शुक्रवारी पहाटे दीड वाजता तोंडाला रुमाल बांधून दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा मुख्य दरवाजा तोडून मंदिरात प्रवेश केला व मंदिरातील दानपेटीचे कुलूप स्कूड्रायव्हरच्या सहाय्याने तोडून त्यातील रक्कम मंदिरातील असणाऱ्या रुमालात बांधली,

त्यानंतर देवाच्या मूर्तीजवळ असणाऱ्या वस्तूंकडे चोरट्यांचे लक्ष गेले, मुख्य मूर्तीजवळ असलेल्या खंडोबाची पितळी धातुची मूर्ती व दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी घेऊन पोबारा केला आहे. सरपंच बंटी गुंजाळ, नामदेव गुंजाळ,

सुनिल गुंजाळ यांनी पारनेर पोलीस ठाण्यात मंदिरातील चोरीबाबत माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. ही संपूर्ण चोरीची घटना मंदिरामधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

दुसऱ्या घटनेत वासुंदे येथील भाऊसाहेब महाराज मंदिरातील नवीनच बसवलेली स्टिलची दानपेटी चोरट्यांनी फोडली. शनिवारी सकाळी ग्रामपंचायत सदस्य पोपट साळुंके, दिलीप उदावंत व रावसाहेब बर्वे हे मंदिरात दर्शनासाठी गेले असता,

ही बाब उघडकीस आली.. यासंबंधीची माहिती टाकळी ढोकेश्वर पोलिसांना स्थानिक ग्रामस्थांनी दिली. सहाय्यक फौजदार मोढवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. दोन्ही घटनेत एकूण किती ऐवज चोरीस गेला, याची माहिती मिळू शकली नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office