मंत्रीमंडळाच्या निर्णयानंतर नगर महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :-  राज्य सरकारने लोकसंख्यानुसार महापालिकामधील नगरसेवकांची संख्या निर्धारित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे प्रारूप आज जाहीर करण्यात आले. त्यानुसार अहमदनगर शहराची लोकसंख्या ३ लाख, ४६ हजार ७५५ आहे.

त्यामुळे नगरसेकांची संख्या सध्याच्या ६८ वरून ७९ होणार आहे. राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान 65 सदस्य व कमाल 175 इतकी आहे. तर नगरपरिषदांमधील सदस्य संख्या किमान 17 सदस्य व कमाल 65 इतकी आहे.

महानगरांमधील व लहान नागरी क्षेत्रांमध्ये झालेले रचनात्मक परिवर्तन व नागरी समस्यांची उकल व विकास योजनांचा वेग वाढविणे यासाठी सर्व कार्यक्षेत्राला योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने सदस्य संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.

दरम्यान लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहीत धरुन अधिनियमात नमुद केलेल्या महानगरपालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत 17 टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. किमान सदस्य संख्या वाढविल्यामुळे पुढील सदस्य संख्या देखील वाढेल व त्यामुळे पर्यांप्त सदस्य संख्या निश्चित होईल.

जिल्ह्यात एवढे नगरसेवक वाढणार

अहमदनगर महानगरपालिकेत सध्या 68 नगरसेवक आहेत. त्यात 17 टक्के वाढ म्हणजे आता ही संख्या 79 होणार आहे.

श्रीरामपूर नगरपरिषदेमध्ये सध्या सदस्यांची संख्या 32 आहे. या नव्या निर्णयानुसार त्यात वाढ होऊन ती 37 पर्यंत वाढू शकते.

राहुरी नगरपालिकेत सध्या 21 सदस्य आहेत. त्यात तीनने वाढ होऊ शकते.

राहाता, पाथर्डी पालिका आणि शिर्डी नगरपंचायतमध्ये सध्या 17 सदस्य आहेत. त्यात प्रत्येकी तीनने वाढ होऊ शकते.

देवळालीत सध्या 18 सदस्य आहेत. तेथेही तीन सदस्य वाढू शकतील.

कोपरगावात सध्या 26 नगरसेवक आहेत. येथे 4 नगरसेवक वाढू शकतात.

संगमनेरात सध्या 28 नगरसेवक आहेत. येथे 4 ते 5 नगरसेवक वाढू शकतात.