अहिल्यानगर ब्रेकिंग : 1600 फूट खोल सापडला तरुणाचा मृतदेह ! मित्रांनी सांगितलं तो…

Published on -

Ahilyanagar Breaking News : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या हरिश्चंद्रगडाच्या कोकण खड्यावरून जवळपास 1600 फूट खोल दरीत एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ऋषिकेश बाळू जाधव (वय 21) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूमागे घातपात झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

बेपत्ता झाल्यानंतर शोधमोहीम

संभाजीनगरमधील रहिवासी असलेल्या ऋषिकेशचा नाशिक येथे शिक्षण सुरू होता. सोमवारी (दि.10) त्याच्याशी फोनद्वारे संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्याचे आई-वडील नाशिकला पोहोचले आणि तिथे शोध घेतला. तो कुठेही आढळून न आल्याने त्यांनी मंगळवारी (दि.11) आडगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

मित्रांनी दिलेली माहिती…

ऋषिकेशचा शोध घेत असताना त्याच्या मित्रांनी सांगितले की, तो मोटरसायकलवरून हरिश्चंद्रगडाकडे गेला होता. ही माहिती मिळताच, त्याचे कुटुंबीय आणि पोलीस हरिश्चंद्रगडाकडे रवाना झाले. तिथे पोहोचल्यावर पार्किंगमध्ये एक मोटरसायकल आढळली, मात्र ऋषिकेशचा थांगपत्ता नव्हता. त्यामुळे कोकणकडा आणि परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली.

1600 फूट खाली मृतदेह सापडला

खोल दरीत शोध घेत असताना 1600 फूट खाली एक मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच, राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दीपक सरोडे यांनी कल्याण येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले. विशेष कौशल्य आणि साधनसामग्रीच्या मदतीने ऋषिकेशचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.

प्रकरणाचा तपास सुरू

शवविच्छेदनासाठी मृतदेह राजूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. नंतर नातेवाईकांच्या ताब्यात तो सोपवण्यात आला. ऋषिकेशचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याचा तपास सुरू असून, त्याच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe