अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ सायबर चोरट्याने अहमदनगर जिल्ह्यातील येवढ्या शेतकर्‍यांना घातला गंडा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- बनावट वेबसाईट तयार करून सरकारी योजनेअंतर्गत सौरपंप देण्याच्या नावाखाली लुट करणारा आरोपी किशोर विठ्ठल काळे (रा. आपेगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) याने आतापर्यंत 14 शेतकर्‍यांना लाखो रूपयांना गंडा घातल्याचे सायबर पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे.

दरम्यान आरोपी काळे याने शेतकर्‍यांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी काही शेतकर्‍यांना गुजरात येथून कमी किंमतीमध्ये खरेदी केलेले सौरपंप दिले होते. त्यातील तीन सौरपंप सायबर पोलिसांनी जप्त केले आहेत.

या फसवणूकीची व्याप्ती मोठी असून सायबर पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांमध्ये कोपरगाव, शेवगावसह औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा समावेश आहे.

त्यानंतर फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांनी या सर्व शेतकर्‍यांचे जबाब नोंदविले आहेत.

सरकारी योजनेअंतर्गत सौरपंप देतो, अशी बतावणी करून माझी फसवणूक केली असल्याची फिर्याद राक्षी (ता. शेवगाव) येथील एका शेतकर्‍याने येथील सायबर पोलीस ठाण्यात दिली होती.

पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (डि) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून आरोपी किशोर काळे याला अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने अनेकांना गंडा घातला असल्याचे समोर आले आहे.