Ahmednagar News : लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुप्यातील अतिक्रमणावर केलेली बेधडक कारवाई हाच चर्चेचा विषय ठरला आहे. शनिवार दि. २५ रोजी सुपा बसस्थानकापासून ते एमआयडीसी चौकापर्यंत अतिक्रमणे काढली. काही ठिकाणी अतिक्रमणधारकांना ३० तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती. माजी आमदार नीलेश लंके यांचे पारनेर रस्त्यावर एमआयडीसी चौकात संपर्क कार्यालय होते. हे कार्यालय देखील अतिक्रमणात असल्याने शनिवारी इतर अतिक्रमणासोबत ते देखील जमीनदोस्त करण्यात आले.
शनिवारी सकाळीच बांधकाम विभाग, चेतक एंटरप्रायजेस यांच्यावतीने सुपा बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावरील अतिक्रमणावर आता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. ही मोहीम सुरू असताना काही अतिक्रमणधारकांनी आम्हाला ३० तारखेपर्यंत मुदत देण्यात यावी अशी विनंती केली. या विनंतीला मान देत अतिक्रमण मोहीम थांबवण्यात आली होती.
३० तारखेचा दिलेला शेवटचा अल्टिमेटम संपल्यानंतर आज पुन्हा शनिवार दि.१ जून रोजी दुपारी २ वाजता मोठा फौजफाटा बसस्थानक परिसरात दाखल झाला. व राहिलेले अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.सुपा बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावर औद्योगिक वसाहत चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार ही अतिक्रमणे तात्काळ काढून घ्यावेत असे आदेश देण्यात आले होते. परंतू स्वत: हून अतिक्रमणे काढली जात नव्हते.
मध्यंतरी लोकसभा निवडणूक लागल्याने ही मोहीम थंडावली होती. मात्र शनिवार दि. २५ रोजी व शनिवार दि. १ रोजी दुपारी २ वाजता पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. व उर्वरित अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. यापूर्वी रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांची दुकाने, चहा सेंटर, चपलांची दुकाने, कपड्यांची दुकाने, मटन शॉप, पानटपरी, बाजार तळ समोरील अतिक्रमण, सुपा हाईट्स समोरील कंपाऊंड, तसेच शहाजापुर चौकात सुमारे पन्नास वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले मळगंगा देवीचे मंदिर अतिक्रमणात असल्याने तेही जमीन दोस्त करण्यात आले. तर औद्योगिक चौक ते नगर – पुणे महामार्ग अंतर्गत अतिक्रमणे देखील काढण्यात आली असून ही मोहीम दोन दिवस चालणार आहे.
अचानक आलेल्या या मोहिमेमुळे टपरीधारकांची एकच धांदल उडाली, जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे काढली जात असल्याने टपरीधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुपा बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. दुकाने रस्त्यावर थाटल्याने वाहतूकीचा नेहमी खोळंबा होत. बुधवारी बाजारच्या दिवशी वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली होती.
याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. तर चोर्यांचे प्रमाण वाढले होते. हे सर्व अतिक्रमण काढण्यात आल्याने सुपा – पारनेर रस्त्याने प्रथमच मोकळा श्वास घेतला. उर्वरीत नगर- पुणे महामार्गावरील अतिक्रमणे रविवार देखील काढण्यात येत आहेत.