Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीचा जोरदार धुराळा आता संपूर्ण राज्यात उठला असून दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका तसेच प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांच्या गाव भेटी आणि प्रचार दौरे व मतदारांशी संवाद साधने इत्यादीमुळे आता राजकीय वातावरण ढवळून निघताना दिसून येत आहे.
इतकेच नाहीतर आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडू लागले आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर ठिकाणी प्रमुख लढत ही विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यामध्ये आहे.
या ठिकाणी जर आपण बघितले तर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत असून त्यांच्या गाव भेटींचा धडाका मोठ्या प्रमाणावर सुरू असून मतदारांशी संवाद साधण्यावर त्यांचा भर दिसून येत आहे. काल त्यांनी तालुक्यातील वाघाचा आखाडा, तांदुळवाडी तसेच कोंढवड, शिलेगाव येथे प्रचार दौरा केला व तेव्हा त्यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर टीका केली.
कर्डिले यांना पराभवाची चाहूल लागल्याने ते सैरभैर
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांनी काल वाघाचा आखाडा तसेच तांदुळवाडी व शिलेगाव इत्यादी ठिकाणी प्रचार दौरा आयोजित केलेला होता व त्यावेळी त्यांनी बोलताना माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर निशाणा साधला व त्यावेळी त्यांनी म्हटले की, कोरोना कालावधीमध्ये जनतेचे प्राण वाचावेत म्हणून आम्ही जीवाची पर्वा न करता झपाटून काम केले.
त्यावेळी मात्र माजी आमदार शिवाजी कर्डिले स्वतःचा जीव वाचवत घरात बसले. त्यांना मागील निवडणुकीत दहा वर्षाच्या निष्क्रिय कारभारामुळेच जनतेने त्यांना नाकारले आता पुन्हा त्यांना पराभवाची चाहूल लागल्यामुळे ते सैरभैर झाले असल्याची टीका आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी केली.
यावेळी बोलताना प्राजक्त तनपुरे म्हणाले की, ग्रामीण भागातील जे काही रस्त्यांची कामे मंजूर झालेली होती त्या कामांना स्थगिती देण्याचे पाप महायुती सरकारने केले. रस्त्यावर संघर्ष करून, उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयाच्या माध्यमातून ही स्थगिती उठवली व त्यामुळे रस्त्यांची कामे मार्गी लागली.
कर्डिले यांनी दहा वर्षात एक विद्युत रोहित्र दिले नाही. परंतु ऊर्जा राज्यमंत्री पदाच्या काळात मतदार संघात 400 रोहित्र दिले. इतकेच नाही तर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी याकरिता नवीन सौर ऊर्जा कृषी वाहिनी प्रकल्पांना मंजुरी दिली. नवीन वीज उपकेंद्र तसेच जुन्या उपकेंद्राची क्षमता वाढ व लिंक लाईनची कामे देखील केली.
तसेच कोरोना काळात शेतकऱ्यांचे दोन लाखांची कर्जमाफी महाविकास आघाडीने केली असल्याची आठवण देखील त्यांनी या निमित्ताने करून दिली. महायुती सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटले की,नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जे काही 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान जाहीर करण्यात आलेले होते ते देखील अनुदान या सरकारने दिले नाही.
राहुरी मध्ये कोरोना रुग्णांसाठी मोफत उपचार केंद्र उभारून हजारो गोरगरीब जनतेचे प्राण वाचवण्याचे काम आम्ही केले. त्यावेळी मात्र जीवाच्या भीतीने अडीच वर्षे घरात बसलेले कर्डिले महायुती सरकार आल्यावर मात्र बाहेर पडले व दहा वर्षे एकही भरीव काम केलेले नाही. त्यामुळेच मागील निवडणुकीत जनतेने त्यांना नाकारले व ते आता टीका करू लागले आहेत असे देखील प्राजक्ता तनपुरे यांनी म्हटले.