श्रीगोंदा तालुक्यात मागील पाच सहा दिवसांपूर्वी चिखली परिसरात झालेल्या सव्वापाच लाख रुपयांच्या लुटीच्या घटनेनंतर तालुक्यात महिनाभरात तब्बल चार ‘ड्रॉप’ झाल्याची चर्चा जोर धरत असून, याप्रकरणी पोलिस ठाण्यात फक्त एकच तक्रार दाखल असून, उर्वरित चर्चेतील प्रकरणे पोलीस ठाण्याबाहेरच चर्चा होऊन ती प्रकरणे दडपली जाणार की, गुन्हा दाखल होणार ?
असा प्रश्न निर्माण होत असून, पोलिसांनी ‘अलर्ट’ होऊन या प्रकारांना आळा घालतानाच संबंधित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत त्यांना अद्दल घडविण्याची गरज आहे.
स्वस्तात सोने देतो म्हणून एखाद्या व्यक्तीला हेरायचे, थोडे सोने देऊन विश्वास संपादन करायचा, त्यानंतर सोने खरेदी करण्यासाठी निर्जन ठिकाणी बोलावून घेत मारहाण करून पैसे, अंगावरील सोने हिसकावून घ्यायचे, असे गुन्हे करणारी टोळी तब्बल दहा वर्षानंतर पुन्हा सक्रिय झाली की काय? असा प्रश्न मागील महिनाभरात तालुक्यात तब्बल चार ‘ड्रॉप’ झाल्याच्या चर्चेनंतर पुढे येत आहे.
दहा ते पंधरा वर्षांपूर्वी स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली शहरी अथवा परप्रांतीय मंडळींचे पैसे लुटण्याचे ‘ड्रॉप’ श्रीगोंद्यात अनेकदा झाले आहेत. गेल्या दहा वर्षांत मात्र ‘ड्रॉप’चे जवळपास पूर्णतः थांबले होते.
मात्र, गेल्या आठवड्यात न्यायाधीशांचे सहकार्य मिळवून देण्याच्या नावाखाली दिल्ली येथील दोघांना बेदम मारहाण करत सव्वापाच लाखांना लुटल्याची घटना चिखली येथे घडल्यानंतर ड्रॉप सारखे प्रकार पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यानुसार गेल्या महिनाभरात तालुक्यात तब्बल एक नव्हे चार ‘ड्रॉप’ झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
महिनाभरापूर्वी मध्यप्रदेशच्या एका पाणीपुरी विक्रेत्याला स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली तालुक्यात बोलवून त्याला पाच लाखांना लुटल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर साधारणतः दीड महिन्यापूर्वीदेखील एक ड्रॉप झाल्याच्या चर्चा झडत असून, तो स्वस्तात सोन्याच्या नावाखाली झाला की, अन्य कोणत्या याबाबत माहिती समजू शकली नाही.
मात्र, याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू असतानाच कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या भावाला लवकर सोडविण्यासाठी न्यायाधीशांचा लघुलेखक व लिपिकाला पैसे देण्याच्या नावाखाली दिल्ली येथील दोघांना बेदम मारहाण करत ५ लाख १५ हजार रुपयांची रोख रक्कम व एक भ्रमणध्वनी जबरदस्तीने पळवून नेल्याची घटना दि.६ रोजी घडली.
याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ताजी असतानाच त्याच चिखली शिवारात रविवारी (दि. १०) पुन्हा एक ‘ड्रॉप’ झाल्याची जोरदार चर्चा समोर येत आहे. हा ड्रॉप स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाखाली झाल्याची चर्चा असून, त्यातील रक्कम अथवा पीडित इसमाबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, महिनाभरात तालुक्यात चार ‘ड्रॉप’ झाल्याची चर्चा रंगली असली तरी पोलीस ठाण्यात मात्र अद्यापपर्यंत फक्त एकच तक्रार दाखल झाली आहे. इतर तीन ‘ड्रॉप’बाबत पोलीस अधिक माहिती मिळवित असल्याचे समजते. तालुक्यातील वाढलेले ‘ड्रॉप’चे प्रमाण लक्षात घेता पोलिसांनी अॅक्शन मोडवर येत गुन्हेगारांचा बीमोड करणे गरजेचे असल्याची सामान्य नागरिकांमधून चर्चा होत आहे.