आर्मीतील माझ्या नवऱ्याने एका अल्पवयीन मुलीसोबत विवाह केला आहे. ती अल्पवयीन मुलगी माझ्या नवऱ्याच्या घरात माझ्या सासू- सासऱ्यासोबत राहते. सरपंच, ग्रामसेवक, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी, जिल्हा पोलिसप्रुमख, महिला बालकल्याण समिती, अहमदनगर, दैनिकांचे कार्यालये, अशी आठ महिने तिने सरकारी कार्यालयात शेकडो चकरा मारल्या. अहमदनगरच्या प्रशासनाने बीडचे नाव सांगितले.
आणि बीडच्या प्रशासनाने नगरकडे बोट दाखविले. मी थकले साहेब आता, आर्मीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागते. तुम्ही माझा आवाज जनतेपर्यंत तरी पोहचवा, अशी करुण कहानी सांगत असताना विजया (नाव बदलले आहे) या इंजिनिअर असलेल्या महिलेच्या डोळ्यात पाणी तरळले. मुळची विजया वडवणीची. उच्च शिक्षित तरीही दहावी पास असलेल्या, मात्र आर्मीमध्ये नोकरीला असलेल्या विनय (नाव बदलले आहे.) याच्या सोबत २०१६ मध्ये विवाह झाला.
सहा वर्षे चांगला संसार झाला. एक मुलगीही झाली. त्यानंतर घरात मतभेद वाढले. विजयाने आर्मी ऑफिसरकडे तक्रार केली, त्याची विनयला सजा मिळाली. पत्नीला गावाकडे सोडले आणि विनय नोकरीला निघून गेला. २०२३ मध्ये विनयने पाथर्डी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीसोबत विवाह केला असल्याचा दावा विजयाने केला आहे. गावचे सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडे बालविवाह झाल्याची तक्रार केली.
मुलीच्या वडिलांनी, नातेवाईकांनी मुलगी मामाकडे शिक्षण घेते, असे सांगितले. मुलीनेही विवाह केल्याचे नाकारले. ग्रामसवेकांनी विजयाला सुरुवातीला गोड बोलून तिच्याकडील पुरावे हस्तगत केले व नंतर असे काही घडलेच नाही, असे सांगितले. ग्रामसेवकाने अहमदगरच्या महिला बालहक्क समितीकडे अहवाल पाठविताना मुलगी व तक्रारदार यांचे घेतलेले व्हीडीओ व ऑडीओ असे जबाब पाठविले नाहीत.
केवळ पंचनामा व मुलीचा जबाब पाठविला. मात्र, तेथील पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी विवाह झाल्याचे सांगतिले असल्याचे पुरावे सोबत जोडले नाहीत. माहितीच्या अधिकारामध्ये मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. जिल्हा पोलिसप्रमुख राकेश ओला यांची भेट घेऊन सर्व कहानी सांगितली. मदत करतो, यापेक्षा काहीच झाले नाही. तहसीलदार, पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी यांच्याकडे दाद मागितली. कोरडी सहानुभूती वगळता हाती काहीच लागले नाही.
मुलगी सासरी राहते, याचे पुरावे दाखविले. तिचा दाखला मिळाला ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, फिर्याद कोणी द्यायची. गुन्हा घडला पाथर्डी तालुक्यातील एका गावात. सध्या मुलगी राहते गेवराई तालुक्यात तक्रारदार वडवणीची. तुम्ही बीडला पोलिसांत जा, असे नगरचे प्रशासनातील अधिकारी सांगतात. बीडचे लोक गुन्हा पाथर्डी तालुक्यात घडल्याने तिकडेच फिर्याद दाखल करा, असे सांगतात.
आठ महिन्यांत शेकडो वेळा अनेक अधिकाऱ्यांना भेटले. मात्र, काहीच झाले नाही. आणखी दोन महिन्यांनी मुलगी अठरा वर्षांची होईल, त्यानंतर तांत्रीक अडचणी उभ्या राहतील, मला न्याय द्या, अशी मागणी विजयाने केली आहे. मी सरकारकडे अनेक वेळा विविध अधिकाऱ्यांना विनवणी केली. आता आर्मीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागते. मात्र, पोलिस, पंचायत समिती, ग्रामसेवक, महिला बालहक्क समिती, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे मला कोणताच न्याय मिळाला नाही.
प्रशासनावरील विश्वास उडाला आहे. गुन्हा कुठे घडला ह्या वादात माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणार कोण? तुम्ही आमचा आवाज निदान जनतेपर्यंत तरी पोहचवा, अशी मागणी विजयाने हिने केली आहे. त्याबाबतचे पुरावे तिने दिले आहेत. आता न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही. वेळ प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल. मात्र, ज्यांनी माझी अवहेलना केली त्यांना पश्चताप करण्याची वेळ आणण्यासाठी माझा संघर्ष सुरुच राहील, असे विजयाने सांगितले.
मोहरी येथील ग्रामसेवकाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी विजया यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांच्याकडे केली आहे. अन्यथा १ मे २०२४ रोजी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. एका महिलेची पिळवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्याला गटविकास अधिकारी पाठीशी का घालत आहेत. मी खुप वेळा तक्रारी केल्या आहेत. आता मी १ मे रोजी उपोषण करणार असल्याचे विजया यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.